सुखाची एक ठरलेली व्याख्या नसावी. प्रत्येकासाठी ते वेगळं असतं. कुणासाठी ते शांत मनात असतं, कुणासाठी प्रेमळ नात्यांत, तर कुणासाठी आपल्या कामातून मिळणाऱ्या समाधानात. त्यामुळे आपली सुखाची व्याख्या ही आपल्या जगण्याच्या पद्धतीतून निर्माण होणारी अनुभूती असणे फार गरजेचे असते.

“मला सांगा..
सुख म्हणजे नक्की काय असतं...
काय पुण्य असतं की ते..
घरबसल्या मिळतं...”
जेष्ठ अभिनेते व नाटककार प्रशांत दामले यांच्या एका सुप्रसिद्ध नाटकातील ह्या गाण्याच्या ओळी जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा नकळत थोडं थांबून विचार करावासा वाटतो...या गाण्याच्या ओळी फक्त सुरेल नाहीत तर त्या आपल्या मनाला एक साधा पण फार खोल प्रश्न विचारतात!
आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत, त्या खरोखर आपल्याला सुख देतात का? आपली सुखाची व्याख्या काय?
मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिलं, तर सुख ही एखादी वस्तू नाही जी मिळवता येते. ती एक अनुभवलेली अवस्था आहे, मनाची, अर्थाची आणि समाधानाची.
लहानपणी आपण सुख खूप साध्या गोष्टींमध्ये शोधत असतो. नवीन पेन मिळणं, पावसात भिजणं, किंवा सुट्टीचा दिवस. पण जसजसं वय वाढतं, तसतसं सुखाची व्याख्या बदलत जाते. समाज आपल्याला सांगतो, चांगलं करिअर, आर्थिक स्थैर्य, प्रतिष्ठा, मोठं घर... हे सगळं मिळालं की माणूस सुखी होतो.
परंतू समुपदेशनाच्या अनुभवातून एक गोष्ट वारंवार जाणवते, जीवनात सगळं व्यवस्थित असूनही अनेक माणसं आतून अस्वस्थ असतात. कारण बाहेरची साध्यं आणि आतलं समाधान हे नेहमी एकाच दिशेने चालतातच असं नाही!
सामान्य रित्या, मानसशास्त्रात सुखाबद्दल दोन महत्त्वाच्या संकल्पना सांगितल्या जातात.
आनंदावर आधारित सुख : ज्यात आनंदाचे क्षण, हशा, आराम आणि सुखद अनुभव असतात.
अर्थपूर्ण सुख : ज्यात जीवनाला उद्देश मिळतो, आपल्या अस्तित्वाला अर्थ मिळतो.
आता खरंतर कोणाच्याही सुखाची व्याख्या ही ज्याच्या त्याच्या विचारांवर, इच्छांवर, परिस्थितीवर अवलंबून असते. परंतू तरीही मला विचाराल तर, अत्युच्च समाधान अथवा सुखाची परिभाषा ही अनेकदा वरील दिलेल्या संकल्पनांपैकी दुसऱ्या प्रकारात सापडते. का?
उदाहरणार्थ, आता माझ्याच कामातून पाहाल तर कधी एखाद्या विद्यार्थ्याला योग्य दिशा मिळाली याचं समाधान, किंवा एखाद्याला दिलासा दिल्यावर त्यांच्या चेहर्यावर दिसणारी ती “सुकून” वाली शांतता, किंवा कोणाचं मोडकळीस आलेलं नातं पुनर्जीवित करून घर जोडून दिल्याची जाणीव आणि ह्या सगळ्यातून मला मिळणारं अतीव समाधान हेच माझ्या कामातून मिळणाऱ्या माझ्या सुखाची परिभाषा होय! (तुम्ही तुमची शोधा बरं का..!)
आजच्या डिजिटल जगात मात्र सुखाची तुलना वाढली आहे. सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य सतत आनंदी आणि परिपूर्ण दिसतं. त्यामुळे नकळत आपण आपल्या आयुष्याला कमी लेखू लागतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात न दिसणारे संघर्ष असतात. हं आता ते त्या झकपक फोटोंमध्ये दिसत नाहीत इतकंच..!
खरं तर सुख नेहमी मोठ्या गोष्टीत सापडत नाही. ते अनेकदा छोट्या क्षणांमध्ये दडलेलं असतं. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवणं, नाती जपणं, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, आणि आपल्या आयुष्यात अर्थ शोधणं या साध्या गोष्टी सुखाच्या दिशेने आपल्याला नेऊ शकतात. आपल्या अस्तित्वाच्या खुणा अशाच क्षणांमध्ये आपल्याला जाणवू लागतात.
त्यामुळेच मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही साध्या सवयी सुखाची जाणीव नक्कीच वाढवू शकतात..जसे कृतज्ञता व्यक्त करणं, नाती जपणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं, आणि आपल्या जीवनात अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणं.
International Happiness Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय आनंद अथवा सुखाचा दिवस कालच अर्थात 20 मार्च रोजी साजरा झाला.. त्यानिमित्त आपल्याला एक महत्त्वाची आठवण करून देते, ती म्हणजे सुख हे काही आपल्या ह्या मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय नव्हे! सुख किंवा आनंद तर ह्या प्रवासात कितीदा भेटेल, कधी गप्पा मारत फार वेळ सोबत राहिल तर कधी ओझरते भेटून परत यायचा वायदा करत निघून ही जाईल..हा लपंडावाचा खेळ तर चालूच राहतो...
कदाचित म्हणूनच कधीतरी मला असं वाटतं की सुखाची एक ठरलेली व्याख्या नसावी. प्रत्येकासाठी ते वेगळं असतं. कुणासाठी ते शांत मनात असतं, कुणासाठी प्रेमळ नात्यांत, तर कुणासाठी आपल्या कामातून मिळणाऱ्या समाधानात त्यामुळे आपली सुखाची व्याख्या ही आपल्या जगण्याच्या पद्धतीतून निर्माण होणारी अनुभूती असणे फार गरजेचे असते.
म्हणून कदाचित त्या गाण्याचा प्रश्न अजूनही तितकाच अर्थपूर्ण वाटतो,
“सुख म्हणजे नक्की काय असतं?”
आणि कदाचित... सुख म्हणजे हेच..
जिथे आपण थांबून जगण्याचा अनुभव घेतो, तिथे.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४