त्या दिवशी स्वयंपाकघरात फक्त हलवा बनला नाही, तर एक सुंदर आठवण तयार झाली. बागेतल्या पिकलेल्या पपईपासून सुरू झालेला तो छोटासा प्रयोग सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला.

सायली शाळेतून आल्यावर जरा गप्प गप्प होती. कारणही तसंच होतं. तिच्या दादाने म्हणजेच रोहनने तिला एक छानशी रेसिपी शिकवायचे कबूल केले होते. पण कामाच्या गडबडीत त्याला वेळ मिळत नव्हता. आता तर तो विसरला की काय असं वाटल्याने तिचा उत्साह कमी होत गेला आणि ती गप्प झाली. तसं पाहता घरात आई, आजी, काकू यांनी तिला थोडाफार स्वयंपाक शिकवला होता. डाळ-खिचडी, चहा तिला चांगला करता येई. पण गोड पदार्थ जरा लांबूनच दाखवले जायचे. कारण पाक हातावर उसळेल, चटका बसेल म्हणून तिला जपलं जाई. सायलीला मात्र गोड पदार्थ आवडत असल्याने ती लुडबुड करे. "एखादा गोड पदार्थ शिकवला तर मी नाही त्रास देणार," असं लाडात येऊन ती म्हणे. पण कुणी तिचं ऐकून घेत नसत.
पण एक दिवस उजाडला सायलीला गोड पदार्थ शिकवण्याचा आणि तोही पपईचा हलवा!
घराच्या मागच्या बागेतली पपईची झाडं त्या वर्षी अक्षरशः बहरलेली. उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ. सकाळच्या उन्हात बागेतल्या पानांवर अजूनही दवबिंदू चमकत होते. झाडावर लगडलेल्या पिवळसर पपया पाहिल्या की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटावं. त्या दिवशी आईने सहजच म्हटलं, “आज एक पिकलेली पपई काढूया. काहीतरी गोड बनवता येईल.”
इतक्यात घरात आलेला रोहन लगेच म्हणाला, “काकू, पपईचा हलवा बनवूया का? मला छान येतो.”
आईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. “अरे वा! तुला हलवा बनवता येतो?”
रोहन हसत म्हणाला, “हो ना. हॉस्टेलवर असताना शिकून घेतलं.”
हे ऐकताच सायली लगेच पुढे आली. “दादा, मला पण शिकव ना. मला गोड पदार्थ बनवायला शिकायचं आहे!”
रोहनने "हो का नाही, मी शिकवतो" असं म्हणताच सायली आनंदाने नाचू लागली.
“चला आपण आधी बागेत जाऊन पपई घेऊन येऊ.”
दोघंही बागेत गेले. झाडावर लगडलेल्या हिरव्या, थोड्या पिकलेल्या पपया पाहून सायली आनंदाने उड्या मारू लागली. “ही काढूया का?” ती विचारत होती. रोहनने झाड हलकेच हलवून पपई तोडली. पिकलेल्या पपईचा वास सर्वत्र पसरला. “वा! किती छान वास येतोय!” सायली म्हणाली.
दोघेही स्वयंपाकघरात आले. आईने आधीच कढई, साजूक तूप, साखर आणि सुका मेवा काढून ठेवला होता.
“चला, आता शेफ सायली तयार आहे का?” रोहनने थोडी मस्करी करत विचारलं.
सायलीने लगेच एक ऍप्रन घातला आणि म्हणाली, “हो! शेफ तयार आहे.”
सगळ्यांना हसू आलं.
रोहनने पपई कापायला घेतली. “सायली हे बघ मी काय काय करतो ते. पहिल्यांदा पपई सोलायची,” तो म्हणाला.
सायली उत्साहाने म्हणाली, “मी करते!”
पण सोलताना तिच्या हातातून पपई घसरली आणि थेट टेबलावर पडली.
“अरेरे, पपई पडली!”
रोहन हसत म्हणाला, “काही हरकत नाही. शेफ लोकांकडून असं होतंच.”
मग दोघांनी मिळून पपईचे बारीक तुकडे केले. बारीक चिरलेली पपई बघून ती आनंदाने म्हणाली, “दादा, हे तर अननसाच्या हलव्यासारखं दिसतंय!”
“हो, तसंच असतं,” रोहन म्हणाला.
आता कढईत तूप तापायला ठेवलं. तूप गरम झालं की त्याचा सुगंध सगळ्या स्वयंपाकघरात दरवळला.
“आता पपईचे तुकडे टाकायचे,” रोहन म्हणाला.
सायलीने थोडी घाईघाईत पपई टाकली आणि लगेचच “छर्रर्र!” असा आवाज झाला.
ती घाबरून दोन पावलं मागे सरकली.
“अगं, स्वयंपाक करताना असे आवाज येतात. घाबरायचं नाही.”
मग दोघांनी मिळून पपई परतायला सुरुवात केली. सायली कढईत चमचा फिरवत होती आणि रोहन तिला सूचना देत होता.
“हळू हळू ढवळायचं. नाहीतर खाली लागेल,” तो सांगत होता.
थोड्या वेळाने पपईचा रंग बदलू लागला. सुगंध आणखी छान येऊ लागला.
“आता साखर टाकूया,” रोहन म्हणाला.
सायलीने वाटीतली साखर उचलली. पण घाईत थोडी साखर कढईबाहेरच सांडली.
आईने लांबून पाहिलं आणि म्हणाली, “अगं, अर्धा हलवा किचन ओट्यावरच होईल असं दिसतंय!”
सायलीने मग उरलेली साखर टाकली. मग त्यात वेलची पूड आणि थोडे काजू-बदाम घातले. आता कढईतलं मिश्रण घट्ट होऊ लागलेलं. सायलीला खूप आनंद झाला.
“दादा, खरंच हलवा बनतोय!” ती म्हणाली.
रोहन म्हणाला, “हो, आणि हा शेफ सायली यांनी पहिलाच गोड पदार्थ बनवला आहे, तोही पपईचा हलवा.”
थोड्या वेळाने हलवा तयार झाला. कढईतून त्याचा गोड सुगंध दरवळत होता. सायलीने छोट्या वाट्यांमध्ये हलवा वाढला. सगळ्यांना चव घेण्यासाठी दिला.
आईने पहिला घास घेतला आणि म्हणाली, “वा! छान झालाय हलवा!”
बाबाही म्हणाले, “आपल्या घरात नवीन शेफ तयार होतोय.”
सायलीला खूप आनंद झाला. गोड हसत ती म्हणाली, “हा मी पहिल्यांदा केलेला गोड पदार्थ!”
रोहन तिच्याकडे पाहून म्हणाला, “पाहिलंस? पहिल्यांदा काहीतरी केलं की थोड्या गमतीजमती होतातच. पण शेवटी मजा येते.”
त्या दिवशी स्वयंपाकघरात फक्त हलवा बनला नाही, तर एक सुंदर आठवण तयार झाली. बागेतल्या पिकलेल्या पपईपासून सुरू झालेला तो छोटासा प्रयोग सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला. सायलीसाठी तर तो दिवस खास होता; कारण त्या दिवशी तिने पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने हलवा बनवला होता. भावाबरोबरच्या गमतीजमतींची चव पपईच्या गोड हलव्यात मिसळलेली होती.

- सौ. मंजिरी वाटवे