घरकाम म्हणजे व्यायाम आहे का?

​घरकाम हे नक्कीच ‘शारीरिक हालचाल’ आहे, पण तो पूर्ण ‘व्यायाम’ नाही. ते आपल्या दैनंदिन हालचालींचा एक भाग आहे, पण शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी नियोजित व्यायाम आवश्यकच आहे.

Story: आरोग्य |
20th March, 09:25 pm
घरकाम म्हणजे व्यायाम आहे का?

​घड्याळात पहाटे पाचचा अलार्म वाजला अन् सीमा घाईघाईत उठली. मुलांचे डबे, नवऱ्याचा नाश्ता, घर आवरणे, कपडे धुणे; सगळं तिच्या डोक्यात फिरत होतं. घरचं सगळं आवरून कशीबशी वेळेत ऑफिसमध्ये पोहोचली. पोहोचेपर्यंत तिचं डोकं अगदी गरगरायला लागलं. तिच्या रोजच्या या दमछाकीने डायबेटिस, ब्लड प्रेशरचाही त्रास सुरू झालेला. दुपारी लंचब्रेकला मैत्रीण म्हणाली, “तू जिमला का जात नाहीस?” सीमा हसत म्हणाली, “अगं, दिवसभर इतकं काम करते, यानेच एवढा व्यायाम तर होतो.. अजून वेगळा व्यायाम कशाला हवा!” सीमासारखा असा समज अनेक महिलांच्या मनात असतो. पण घरकाम म्हणजे खरंच व्यायाम आहे का?

​वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर, घरकामामध्ये शारीरिक हालचाल नक्कीच होते. झाडू मारणे, लादी पुसणे, कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे या सर्व कामांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या स्नायूंचा वापर होतो. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि काही प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात. त्यामुळे “घरकाम म्हणजे काहीच नाही” असं म्हणणं चुकीचं ठरेल.

​पण, व्यायाम आणि घरकाम यात एक महत्त्वाचा फरक आहे, उद्देश आणि पद्धत. व्यायाम करताना आपण ठरवून, नियोजनपूर्वक आणि योग्य तंत्राने शरीराच्या विशिष्ट भागांवर काम करतो. उदाहरणार्थ, ताकद वाढवण्यासाठी 'स्ट्रेंदनिंग' व्यायाम, लवचिकतेसाठी 'स्ट्रेचिंग', किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी 'कार्डिओ' व्यायाम केले जातात. यामध्ये FITT प्रिन्सिपल म्हणजे फ्रिक्वेन्सी (वारंवारता), इंटेसिटी (तीव्रता), ड्युरेशन (कालावधी) आणि टाईप (प्रकार) यांचा विचार केला जातो.

​घरकामामध्ये मात्र ही शिस्त नसते. उदाहरणार्थ, झाडू मारताना आपण सतत एका बाजूला वाकतो, ज्यामुळे पाठदुखी किंवा मानदुखी होऊ शकते. लादी पुसताना चुकीच्या पद्धतीने बसल्यास गुडघ्यांवर ताण येतो. म्हणजेच, घरकामामुळे शरीर हालचालीत असलं, तरी ते समप्रमाणात व्यायाम देत नाही.

​याशिवाय, घरकाम करताना अनेकदा शरीरावर अनावश्यक ताण येतो. विशेष करून महिलांमध्ये पाठदुखी, मानदुखी, खांद्याचा त्रास यांमागे चुकीच्या 'पोश्चर'मध्ये (शरीराची स्थिती) केलेलं घरकाम हे एक मोठं कारण असतं. म्हणूनच, घरकामाला पूर्ण व्यायाम समजणं धोकादायक ठरू शकतं.

​मग उपाय काय? घरकाम पूर्णपणे टाळणं शक्य नाही, पण त्याला अधिक आरोग्यदायी बनवता येतं:

  • काम करताना योग्य 'पोश्चर' ठेवावे.
  •  ​जास्त वेळ वाकून काम करू नये; मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी.
  • ​ दोन्ही हातांचा समान वापर करावा.
  •  ​शक्य असल्यास, शरीरावर कमी तणाव देणारी लांब हँडलची साधनं वापरावीत (उदा. मॉप).

​यासोबतच, दररोज किमान ३० मिनिटे स्वतंत्र व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. यात चालणे, योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा स्ट्रेचिंग यांचा समावेश असू शकतो. हे शरीराला संतुलित आणि मजबूत बनवते, जे केवळ घरकामातून मिळत नाही.

​विशेषतः प्रसूतीनंतरच्या महिलांनी, किंवा ज्यांना पाठदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्या आहेत, त्यांनी फक्त घरकामावर अवलंबून राहू नये. योग्य व्यायाम केल्यास शरीर अधिक सक्षम होते आणि दुखण्यांपासूनही बचाव होतो.

​शेवटी, घरकाम हे नक्कीच ‘शारीरिक हालचाल’ आहे, पण तो पूर्ण ‘व्यायाम’ नाही. ते आपल्या दैनंदिन हालचालींचा एक भाग आहे, पण शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी नियोजित व्यायाम आवश्यकच आहे.

​सीमासारख्या अनेक महिलांनी हा फरक ओळखणं गरजेचं आहे. कारण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून केवळ घराची काळजी घेणं दीर्घकाळात स्वतःलाच त्रासदायक ठरू शकतं.

​घरकाम करा, पण स्वतःसाठी थोडा वेळ काढून योग्य व्यायामही करा, हेच खऱ्या आरोग्याचं रहस्य आहे.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर