मोठ्या झाडाच्या सावलीत रोपटं टिकतं, पण वाढत नाही. त्याला थोडं उन्हं, थोडा वारा, थोडा पाऊस लागतो… तेव्हाच ते मजबूत होतं.

अाई, दे ना..मी करतो!”
दोन वर्षांच्या मुलाच्या तोंडून निघालेलं हे वाक्य ऐकून आपण हसतो... आणि पुढच्या क्षणी म्हणतो, “अरे राहू दे, सांडशील बरं!”
किती गंमत आहे ना?
लहानपणी “मी करतो” म्हणणाऱ्या मुलाला आपण थांबवतो आणि मग मोठं झाल्यावर “तू काहीच करत नाहीस” म्हणून त्यालाच रागावतो!
आमच्या वाड्यावर एक कुटुंब होते. आई बाबा आणि एक गोंडस मुलगा. त्यातली त्या मुलाची आई त्याच्या शाळेच्या बॅगेपासून प्रोजेक्टपर्यंतचं सगळं तिची तीच करत असे. तसे विचारता, ती म्हणे, “मला त्याचं बेस्ट हवंय.”
मग, मी हलकंसं विचारलं, “त्याला त्याचं ‘बेस्ट’ शोधायला तुम्ही वेळ देता का?”
ह्यावर थोडा विराम आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेली एक प्रश्न चिन्हांकित जाणीव मला माझ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुरेशी होती.
अतिदक्ष पालकत्व – प्रेम की नियंत्रण?
आपण मुलांवर प्रेम करतो, त्यांच्यासाठी झटतो पण नकळत त्यांचं आयुष्य “manage” करायला लागतो.
यालाच मानसशास्त्रात overparenting असं म्हणतात.
असे पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीत उपस्थित असतात. डबा कसा खायचा, मित्रांशी कसं बोलायचं, कुठे बसायचं...अगदी पेन्सिलला टोक काढण्यापर्यंत!
पण इथे एक सूक्ष्म फरक आहे, तो म्हणजे Care आणि Control मधला! आपण म्हणतो “मी काळजी घेतेय”, पण मुलाला मात्र वाटतं, “आईचा माझ्यावर विश्वास नाही.”
मग अशावेळी, मुलांच्या मनात काय घडतं?
सिग्मंड फ्राॅईड असता तर कदाचित म्हणाला असता,
बालपणात मिळालेलं असं
अतिसंरक्षण हे आपल्या मनात एक अवलंबात्मक पॅटर्न तयार करतं. ज्यामुळे मुलांच्या मनात हळूहळू एक विश्वास बसत जातो.
“मी स्वतः काही करू शकत नाही.”
“कोणीतरी माझ्यासाठी करणारच.”
विशेष म्हणजे, मानसशास्त्रज्ञ एरिक्सनच्या मते, बालपणीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे Autonomy vs Shame.
जर मुलाला स्वतः करण्याची संधी मिळाली नाही, तर तो self-doubt घेऊन मोठा होतो.
आणि मग...मोठं झाल्यावर आपणच म्हणतो, “अरे! ह्याला आत्मविश्वासच नाहीये!”
एक छोटंसं उदाहरण...
एक १० वर्षांचा मुलगा काउन्सेलिंगला आला होता. त्याची आई म्हणाली “तो खूप dependent आहे हो”
मी त्याला विचारलं, “तू बॅग भरतोस का?”
तो हसला, “आईला जास्त चांगलं येतं.”
आता ऐकताना, हे उत्तर गोड वाटू शकतं पण त्यात एक सवय लपलेली असते, ती म्हणजे, Responsibility outsource करणं अर्थात आपल्या जबाबदारीची टोपली अलगद इतरांकडून वाहून नेणे. मला विचाराल तर, तसे करण्यात त्या मुलाचे काहीच चुकत नाही. कारण त्याला तशी सवय घालून दिली गेली आहे. कोणाकडून विचारता? अहो, पालकांच्या पॅम्परिंगची करामत
असते ही!
पॅम्परिंग म्हणजे नेमकं काय नाही?
पॅम्परिंग काय आहे हे तर सर्वश्रुत आहे. परंतू पॅम्परिंग काय नाही आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे जसे,
मुलाला मिठी मारणं = पॅम्परिंग नाही
️त्याच्या भावनांना मान्यता देणं = पॅम्परिंग नाही
️त्याचं कौतुक करणं = पॅम्परिंग नाही
कारण हे सगळं emotional nourishment आहे अर्थात मुलांच्या भावनिक स्वास्थ्यासाठीचे पौष्टिक खाद्य!
पण
त्याची प्रत्येक छोटी कामं आपण करणं
️त्याच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणं
त्याला अडचण येऊच न देणं
हे मात्र अतिदक्ष पालकत्व आहे. जे जितके चांगले आहे तितकेच हानिकारक सुध्दा! का?
अशा मुलांमध्ये पुढे दिसतं ते,
कमी Emotional Quotient
अपयशाची भीती
️स्वकेंद्रित वर्तन
️“मला सगळं मिळायलाच हवं” ही वृत्ती
आणि हे असे का घडते? कारण त्यांनी “प्रयत्न - अपयश - शिकणं” हा प्रवास अनुभवलेलाच नसतो.
मग ह्यावर उपाय काय?
वयानुसार छोटी कामं द्या : बॅग भरणं, स्वतःचे कपडे ठेवणं
चुका होऊ द्या : त्या शिकण्याचा भाग आहेत
“मी आहे तुझ्यासोबत” हा संदेश द्या : मुलांना आयते “मी करतो तुझ्यासाठी” असे करून देऊ नका.
मदत करा : पण मागितल्यावरच!
शेवटचा विचार...
मोठ्या झाडाच्या सावलीत रोपटं टिकतं, पण वाढत नाही.
त्याला थोडं उन्हं, थोडा वारा, थोडा पाऊस लागतो... तेव्हाच ते मजबूत होतं.
मग, पालक म्हणून आपण मुलांना काय देऊ शकतो?
महागडी खेळणी? परफेक्ट आयुष्य?
की एक साधी, पण आयुष्यभर उपयोगी भेट? कसली विचारता?
“अहो, मी सक्षम आहे... I AM CAPABLE” असा आत्मविश्वास त्यांच्या अंगी रूजवणे.
त्यामुळे, सरतेशेवटी, आता थोडंसं स्वतःला देखील विचारा,
तुम्ही तुमच्या मुलाला हात धरून चालवताय...
की त्याच्या पायांना चालायला शिकवताय?

मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४