जेव्हा कोरोना काळ संपला आणि अदितीने इयत्ता चौथीमध्ये पुन्हा शाळेत पाऊल ठेवले, तेव्हा तिचे रूप पूर्णपणे बदलले होते. जिला लिहिता-वाचता येत नव्हते, ती आता आत्मविश्वासाने उत्तरे देऊ लागली होती.

अदिती सहा वर्षांची असताना तिच्या आयुष्यात एका गोड परीचे, तिच्या छोट्या बहिणीचे आगमन झाले. आतापर्यंत घरातील सर्व लाड आणि आईचा पूर्ण वेळ फक्त अदितीचाच होता, पण आता तो विभागला गेला. आई आपला जास्तीत जास्त वेळ छोट्या बहिणीसोबत घालवू लागली. हे पाहून सहा वर्षांची छोटी अदिती मनातून पार हिरमुसली होती. नक्की काय बदलत आहे, हे तिच्या बालमनाला समजत नव्हते.
दुसरीकडे, मोठ्या बालवर्गानंतर आई-बाबांनी तिला एका नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला होता. नवीन वातावरण आणि इंग्रजी भाषेचा अडसर यामुळे अदिती तिथे एकलकोंडी झाली. वर्गात गप्प राहणे तिला जास्त सोयीचे वाटू लागले. ती कोणाशी बोलायची नाही, फक्त इतरांच्या खोड्या काढत शांत उभी राहायची. याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला. पाचपैकी कधी शून्य तर कधी एक गुण मिळे. तिच्या अभ्यासाचे पार 'बारा वाजले' होते. आई तरी काय करणार? एका बाजूला तान्ह्या बाळाची जबाबदारी आणि दुसरीकडे अदितीची ही ओढताण, अशा कात्रीत ती सापडली होती.
वर्ष संपता संपता मार्च महिना उजाडला आणि अचानक 'कोरोना' नावाचे संकट समोर आले. शाळा बंद झाल्या आणि घरूनच शिकण्याचे दिवस आले. आईने ही संधी ओळखली. अदितीची शैक्षणिक अवस्था पाहून तिला चिंता वाटू लागली होती. आईने अगदी मुळापासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. तिने पुन्हा एकदा 'अंकलिपी' काढली. मराठी मुळाक्षरे, इंग्रजी अल्फाबेट्स, धडे वाचणे आणि दररोज एक पान सुवाच्य अक्षरात लिहिणे, असा कडक सराव तिने अदितीकडून करून घेतला.
पुढील दोन वर्षे हा उपक्रम न थकता सुरू होता. याच काळात आईने तिला गाण्याच्या वर्गातही घातले. गाण्यातील गोडीमुळे मराठी शब्दांचे उच्चार स्पष्ट होतील आणि मुळाक्षरे लक्षात राहतील, हा त्यामागचा उद्देश होता. हळूहळू अदितीलाही गाण्याची आवड निर्माण झाली.
जेव्हा कोरोना काळ संपला आणि अदितीने इयत्ता चौथीमध्ये पुन्हा शाळेत पाऊल ठेवले, तेव्हा तिचे रूप पूर्णपणे बदलले होते. जिला लिहिता-वाचता येत नव्हते, ती आता आत्मविश्वासाने उत्तरे देऊ लागली होती. चौथीत तिने ८०% गुणांपर्यंत मजल मारली आणि पाचवीत तर ती चक्क वर्गात पहिल्या पाच क्रमांकांत झळकली!
आज अदितीची आई निर्धास्त आहे. दोन वर्षे तिने घेतलेल्या कष्टांचे फळ तिला मिळाले आहे. जर त्या काळात आईने जिद्दीने लक्ष दिले नसते, तर कदाचित अदिती प्रवाहाच्या मागेच राहिली असती.
तात्पर्य: आपले मूल अभ्यासात 'शून्य' असले तरी, त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य आई-वडील किंवा योग्य शिक्षक यांच्यात नक्कीच असते. गरज असते ती फक्त संयम आणि सोबतीची.

- गौरी रोशन वेर्लेकर