आज मागे वळून पाहताना तिला ते लाकडी व्यासपीठ आठवतं. फाटलेला पडदा, थरथरता माईक आणि ते पहिलं वाक्य... जिथे आपण पहिल्यांदा स्वतःसाठी उभं राहिलो.

ते व्यासपीठ फार मोठं नव्हतं. शाळेच्या सभागृहात लाकडी फळ्यांवर उभं केलेलं, चार पायांवर तोल सांभाळत उभं असलेलं. मागे फाटलेला पडदा, एका बाजूला माईकची लांबलचक तार गुंडाळलेली. पण त्या क्षणी ते तिला एखाद्या पर्वतासारखं काहीतरी मोठं वाटत होतं. उंच, थरकाप उडवणारं आणि तरीही काहीतरी नवीन करण्याची उर्मी निर्माण करणारं, खुणावणारं.
खाली बसलेली मुलं, समोर पहिल्या रांगेत बसलेले शिक्षक आणि कोपऱ्यात उभे असलेले आई-बाबा. सगळेजण तिच्याचकडे पाहत होते. तिचं नाव जाहीर झालं आणि ती नकळत आपोआप पुढे चालू लागली. मनातल्या भीतीमुळे वाढलेलं हृदयाचं धडधडणं कानात ऐकू येत होतं. हातात धरलेला कागद घामाने भिजून ओला झाला होता. आज ती पहिल्यांदा व्यासपीठावर बोलण्यासाठी उभी होती. हे तिचं पहिलं व्यासपीठ होतं.
त्याआधी व्यासपीठ म्हणजे फक्त समोरून पाहिलेली जागा होती. तिथे उभं राहून बोलणाऱ्या व्यक्ती नेहमी आत्मविश्वासाने बोलायच्या. त्यांच्या बोलण्यातील शब्दांचा ठामपणा, आवाजातील स्पष्टता; हे सर्व त्यांना कसं शक्य होतं, हा तिला नेहमी पडणारा प्रश्न. या प्रश्नाची उकल तिला अजून झाली नव्हती. पण आज ती स्वतः तिथे उभी होती. अनेक प्रश्न मनात घोळत होते, काही चुकलं तर? कुणी समोरून हसलं तर? बोलताना घाबरल्यामुळे आवाजात झालेला बदल लोकांना कसा वाटेल? एक ना अनेक प्रश्न ती व्यासपीठावर पोहोचेपर्यंत मनात येत होते. एका मिनिटाच्या या वेळेत किती आणि काय काय प्रश्न यावेत!
पण व्यासपीठावर पोहोचल्यावर माईक हातात घेतल्यावर तो प्रश्नांचा गोंगाट क्षणभर थांबला. तिला समोर बघितल्यावर दिसलेली पहिली गोष्ट म्हणजे मैत्रिणीचं हसणं. ते हसणं तिला आश्वासक वाटलं, धीर देणारं होतं. एक सेकंद तिने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलायला लागली.
पहिल्या वाक्यात आवाज थोडा थरथरला, तरी दुसऱ्या वाक्यात तिने शब्द सावरले. नंतर ती बोलू लागली. तिला स्वतःचाच आवाज ऐकू येत होता, जसा तो आधी कधीच ऐकू आला नव्हता. तो आवाज फक्त दुसऱ्यांना ऐकू जाणारा नव्हता, तर तो स्वतःला शोधणारा होता.
व्यासपीठावर उभी राहिल्यावर तिला पहिल्यांदा जाणवलं की, आपलं बोलणं समोर बसून कुणीतरी ऐकत आहे. एरव्ही मुलींना लहानपणापासून 'दुसऱ्याचं ऐकायचं' असं शिकवलं जातं, 'बोलायला' नाही. 'हळू बोल', 'मोठ्या आवाजात बोलू नकोस', 'जास्त बोलू नकोस', अशा प्रकारच्या सूचना इतक्या सवयीच्या होतात की मुलींना आपला आवाज आपलाच नाही, असं वाटायला लागतं. त्या दिवशी मात्र तिने आपला आतला तो आवाज स्वतः ऐकला होता.
कार्यक्रम संपला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. सुरुवातीला व्यासपीठावर जाताना झालेली धाकधूक आणि भीती आता नाहीशी झाली होती. व्यासपीठावरून ती खाली उतरली, प्रेक्षकांत येऊन बसली; पण मनाने ती अजूनही तिथेच होती. थोडीशी घाबरलेली, पण आनंदी अशी.
तिची आई जवळ आली. “छान बोललीस,” एवढंच म्हणाली. त्या वाक्यात कौतुक होतं आणि एका बदलाचा स्वीकारही होता. कधी कधी स्वीकारणं आणि मोजक्याच शब्दांतून व्यक्त झालेलं कौतुक हे सर्वांत मोठं बक्षीस असतं.
त्या दिवसानंतर व्यासपीठ तिला पुन्हा पुन्हा खुणावू लागलं. कधी लहान कार्यक्रम, तर कधी मोठ्या कार्यक्रमांत. कधी शाळेत, तर कधी उत्सवांत सहभागी होऊन ती अनेक वेळा व्यासपीठावरून व्यक्त झाली. दरवेळी थोडीशी धाकधूक व्हायची, भीती वाटायची; पण एकदा माईक हातात घेतला की ती भीती नाहीशी व्हायची आणि ती आत्मविश्वासाने बोलायची. तिच्या पहिल्या व्यासपीठाने तिला एक गोष्ट शिकवली. ती म्हणजे भीती असूनही पुढे जाता येतं.
प्रत्येक स्त्रीसाठी पहिलं व्यासपीठ हे फक्त कार्यक्रमापुरतं नसतं. ते घरात आपलं मत मांडणं असू शकतं, ऑफिसमध्ये स्वतःचा मुद्दा ठामपणे सांगणं असू शकतं किंवा समाजात प्रश्न विचारणं असू शकतं. प्रत्येक वेळी तीच धडधड, तेच प्रश्न, आणि तरीही बोलायचा घेतलेला खंबीर निर्णय!
आज मागे वळून पाहताना तिला ते लाकडी व्यासपीठ आठवतं. फाटलेला पडदा, थरथरता माईक आणि ते पहिलं वाक्य... जिथे आपण पहिल्यांदा स्वतःसाठी उभं राहिलो. शब्द कदाचित नीट जुळले नसतील, आवाजही थरथरला असेल, पण आपण 'बोललो' हेच महत्त्वाचं होतं.
पहिलं व्यासपीठ आपल्याला फक्त प्रसिद्धी देत नाही, तर ते आपल्याला स्वतःची नवी ओळख करून देतं.

- मंजिरी वाटवे