लाॅ ऑफ अट्रॅक्शन' आणि आपण..

तुम्हाला हवं ते मिळत नाहीये… कारण तुम्ही चुकीचा मंत्र म्हणत नाही, तर चुकीच्या 'स्वतःला' वापरत आहात.

Story: मनी मानसी |
03rd April, 09:53 pm
लाॅ ऑफ अट्रॅक्शन' आणि आपण..

“म​नापासून चिंतन करा आणि विश्व तुम्हाला ते देईल!”

राॅनडा ब्रायन यांचे “दि सिक्रेट” वाचल्यानंतर अनेकांच्या मनात आकर्षणाचा नियम अर्थात लाॅ ऑफ अट्रॅक्शन काम करतो का? मुळात खरंच असं काही असतं का? असे असंख्य प्रश्नांची मंदियाळी सुरू होते. पण मग काही दिवसांनी त्या पुस्तकातलं सगळं करून ही जेव्हा हवा तसा प्रत्यय येत नाही तेव्हा तोच प्रश्न पुन्हा डोळे वटारून आपल्याकडे पाहत राहतो, “माझ्याबाबतीत का काम करत नाही हा लॉ ऑफ अट्रॅक्शन?”

एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मला नेहमी वाटतं की, आपण विश्वाचे नियम समजून घेण्याआधी ‘स्वतःचं मन’ समजून घेतलंय का?

आपण सगळेच आयुष्यात काही ना काही “मॅनिफेस्ट” करण्याचा प्रयत्न करत असतो. कुणी व्हिज्युअलायझेशन करतं, कुणी अफर्मेशन्स म्हणतं, कुणी प्रचंड मेहनत घेतं...e आणि तरीही परिणाम वेगवेगळे का येतात?

इथेच येतो एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपला असणारा एक वैयक्तिक पॅटर्न.

मनाचे पॅटर्न: आपल्या यशाचा नकाशा

लहानपणीच्या अनुभवांपासून ते पालकांच्या वागण्यापर्यंत, किंवा आपल्यावर झालेल्या कौतुक-टीकेतून देखील आपल्यात काही “अदृश्य स्क्रिप्ट्स” तयार होत असतात. सायको-अॅनालिसिस मध्ये यालाच अनकॉन्शस पॅटर्न्स असं सुध्दा म्हणतात.

उदा. एक क्लायंट मला एकदा म्हणाली, "मी काहीतरी मिळवायचं ठरवलं की आधी खूप प्लॅनिंग करते, लिस्ट बनवते...आणि मगच ते साध्य होतं."

तर दुसरी म्हणाली,

"मी जास्त विचार केला की गोंधळते... मी डायरेक्ट उडी घेतली की माझं काम होतंच!"

आता ह्यातून आपल्याला काय कळतं? दोघींचंही “लॉ ऑफ अट्रॅक्शन” काम करतंय, पण वेगवेगळ्या पद्धतीने!

काही लोकांना सहज उद्दिष्टपूर्ती होते, असं का?

आपण अनेकदा ऐकतो, "मी काहीच केलं नाही, आणि अचानक संधी मिळाली!"

हे खरंच “जादू” आहे का?

कदाचित नाही.

अशा लोकांमध्ये अनेकदा रिसेप्टिविटी पॅटर्न असतो, ते संधी स्वीकारायला तयार असतात. त्यांच्या मनात “मी योग्य आहे” ही खोलवरची धारणा असते. त्यामुळे संधी आली की ते तिला नाकारत नाहीत.

तर काही लोकांमध्ये एफर्ट-बेस्ड बिलीफ सिस्टीम असतो! जसं, “कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही.”

मग त्यांच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन = ऍक्शन + इंटेन्शन

सायको-अॅनालिटिक दृष्टिकोनातून आपल्या मेंदूत “रिवॉर्ड पाथवेज” तयार होतात. जर एखाद्या पद्धतीने यश मिळालं, तर मेंदू म्हणतो, “अरे! हाच फॉर्म्युला पुन्हा वापर!” म्हणूनच काही लोकांना आधी तयारी केल्यावरच यश मिळतं. 

काहींना आधी जुनं सोडलं की नवीन येतं..काहींना आधी खात्री हवी असते, मगच पाऊल उचलतात..परंतू गंमत म्हणजे हा सगळं “विश्वाचा नियम” नसून आपल्या मनाचा प्रोग्रॅमिंग कोड आहे.

उदा. एकदा एक मुलगा काउन्सेलिंगला आला. तो म्हणाला,

"मॅम, मी खूप अफर्मेशन्स म्हणतोय... पण काहीच बदलत नाही हो."

मी त्याला विचारलं, "तू आधी कधी काही अचीव्ह केलं आहेस?" तो म्हणाला, "हो...पण तेव्हा मी रोज थोडं थोडं काम करत होतो."

मग त्याला कळलं, 

  •   त्याचा पॅटर्न आहे कन्सिस्टंट ऍक्शन
  •   अफर्मेशन्स नव्हे, तर ऍक्शन-ट्रिगर त्याचं की आहे
  •   मग करायचं काय?
  • लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकण्याआधी, स्वतःचा अट्रॅक्शन पॅटर्न शोधा! स्वतःला विचारा, 
  •   माझं सर्वात महत्वाचं मोठं यश मला कसं मिळालं होतं?
  •   मी तेव्हा काय वेगळं केलं होतं?
  •   मी प्लॅनर आहे का स्पॉन्टेनिअस?
  •   मी आधी विसंबून राहतो की परिस्थितीवर घट्ट पकड ठेवायचा प्रयत्न करतो?

मग मला सांगा, लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच आहे का?

कदाचित आहे...पण तो “बाहेर” कमी आणि “आत” जास्त काम करतो. विश्व तुमचं ऐकतं की नाही माहीत नाही... पण तुमचं सबकॉन्शस मात्र तुम्हाला खूप लक्षपूर्वक ऐकत असतं!

त्यामुळे एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला हवं ते मिळत नाहीये... कारण तुम्ही चुकीचा मंत्र म्हणत नाही, तर चुकीच्या “स्वतःला” वापरत आहात. 


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४