आई मायेची सावली आणि जीवनाचे आधारस्तंभ

​आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला संकटात लढण्याचे बळ देते. आपल्या यशात तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात, तर आपल्या दुःखात ती ढाल बनून उभी राहते. देव प्रत्येक ठिकाणी स्वतः पोहोचू शकत नव्हता, म्हणून त्याने 'आई' नावाचे रूप पृथ्वीवर धाडले, असे म्हटले जाते.

Story: ललित |
03rd April, 10:01 pm
आई मायेची सावली आणि जीवनाचे आधारस्तंभ

"आ" हा केवळ दोन अक्षरी शब्द नसून त्यात संपूर्ण विश्वाचा मायेचा सागर सामावलेला आहे. आई ही केवळ जन्मदात्री नसते, तर ती आपली पहिली गुरु आणि आयुष्यभराची सर्वात जवळची मैत्रीण असते. तिचे आपल्यावरचे प्रेम हे कोणत्याही अटींविना असते. ती कधी रागावते, कधी चिडते, तर कधी आपल्या चुकांवर ओरडते; पण त्या प्रत्येक ओरड्यामागे आपल्या भविष्याची काळजी आणि अथांग प्रेम दडलेले असते. जेव्हा ती आपल्याला शिक्षा करते, तेव्हा आपल्यापेक्षा जास्त वेदना तिच्या मायेच्या काळजाला होत असतात, पण आपल्याला घडवण्यासाठी ती कठोरपणाचा मुखवटा धारण करते.

​मराठी साहित्यात आणि संतांच्या वाणीत आईचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले आहे. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे वचन सार्थ आहे, कारण जगातील सर्व ऐश्वर्य एका बाजूला आणि आईची कुशी एका बाजूला ठेवली, तरी आईच्या प्रेमाचे पारडे नेहमी जडच राहील. ज्यांच्या नशिबात आईचे प्रेम आहे, ते या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती मानले जातात.

​माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझी आई ही सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्रीच्या अंथरुणापर्यंत मला पावलोपावली तिची सोबत हवी असते. घरात पाऊल ठेवताच "आई..." अशी हाक मारल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. ती घरात नसली की घर एखाद्या रिकाम्या वास्तू सारखे वाटते, तिथे चैतन्य उरत नाही. तिचे कष्ट, तिचे आपल्यासाठी घेतलेले परिश्रम आणि तिने दिलेला प्रत्येक त्याग हे आपल्या प्रगतीचा पाया असतात.

​आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला संकटात लढण्याचे बळ देते. आपल्या यशात तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात, तर आपल्या दुःखात ती ढाल बनून उभी राहते. देव प्रत्येक ठिकाणी स्वतः पोहोचू शकत नव्हता, म्हणून त्याने 'आई' नावाचे रूप पृथ्वीवर धाडले, असे म्हटले जाते. खरोखरच, आई ही ईश्वराची सर्वात अनमोल आणि सुंदर भेट आहे. तिचे ऋृण आपण कधीही फेडू शकत नाही, फक्त तिच्यावर मनापासून प्रेम करून तिला आनंद देणे हेच आपले कर्तव्य आहे.


- हर्षदा रत्नाकर गावस

केरी सत्तरी गोवा