अपहरण आणि बलात्कार यांसारखे गुन्हे थांबवण्यासाठी फक्त कायदे किंवा सरकार पुरेसे नाहीत. यासाठी प्रत्येकाच्या मनात बदल होणे आवश्यक आहे. स्त्रीचा आदर, तिचं स्वातंत्र्य आणि तिची सुरक्षितता यांना महत्त्व दिलं तरच आपण एक सुरक्षित समाज घडवू शकतो.

आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. विज्ञानाने प्रगती केली, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, शिक्षणाचा प्रसार वाढला पण या सगळ्या प्रगतीसोबतच एक काळी बाजूही आपल्यासमोर उभी राहिली आहे. ती म्हणजे वाढत चाललेले अपहरण आणि बलात्काराचे प्रकार. दररोज वर्तमानपत्र उघडलं की अशा बातम्या डोळ्यांसमोर येतात. एखादी लहान मुलगी बेपत्ता झाली, एखाद्या महिलेसोबत अत्याचार झाला, कुणाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं हे सगळं वाचताना मन हेलावून जातं. प्रश्न पडतो तो म्हणजे "आपण खरंच प्रगत झालो आहोत का?"
अपहरण आणि बलात्कार हे फक्त गुन्हे नाहीत, तर ते माणुसकीवर केलेले घाव आहेत. एका मुलीचं अपहरण झालं की फक्त तिचं आयुष्यच बदलत नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा आभाळ कोसळतो. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू, त्यांची असहाय्यता आणि समाजातील भीती हे चित्र खूप वेदनादायक असतं. विशेषतः लहान मुलींवर होणारे अत्याचार हे अत्यंत भयानक आहेत. ज्या वयात त्या निष्पापपणे खेळत असतात त्या वयात त्यांच्यावर असे अत्याचार होणे म्हणजे मानवतेलाच काळीमा फासणारी गोष्ट आहे. अशा घटनांनी आपला समाज किती असंवेदनशील झाला आहे हे स्पष्ट दिसून येते.
या वाढत्या गुन्ह्यांची कारणे काय आहेत, याचा विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतात. काही लोकांची विकृत मानसिकता हे मुख्य कारण आहे. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी आजही अनेकांच्या मनात आहे. हीच मानसिकता अशा गुन्ह्यांना जन्म देते. तसेच, सोशल मीडियाचा चुकीचा वापरही यामागे एक कारण आहे. इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारी अश्लील सामग्री, चुकीचे विचार आणि त्याचा तरुणांच्या मनावर होणारा परिणाम हे सर्व धोकादायक आहे. योग्य मार्गदर्शन आणि नियंत्रण नसल्यामुळे काहीजण चुकीच्या मार्गावर जातात. संस्कारांचा अभाव हेही एक महत्त्वाचं कारण आहे. घरातूनच मुलांना स्त्रीचा आदर करायला शिकवले गेले पाहिजे. “स्त्री ही वस्तू नाही, ती एक व्यक्ती आहे” ही जाणीव लहानपणापासूनच मनात रुजवली गेली पाहिजे. पण आज अनेक ठिकाणी हे संस्कार कमी पडताना दिसतात.
कायद्याच्या अंमलबजावणीत असलेली ढिलाईही गुन्हेगारांना धाडस देते. काही वेळा गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यात भीती राहत नाही. “आपल्याला काही होणार नाही” ही भावना वाढीस लागते आणि गुन्हे वाढतात. यावर उपाय काय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सर्वप्रथम, कायदे अधिक कठोर झाले पाहिजेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. गुन्हेगारांना लवकर आणि कडक शिक्षा मिळाली तरच इतरांमध्ये भीती निर्माण होईल. पोलिस यंत्रणाही अधिक सतर्क आणि सक्षम असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे.
तसेच, महिलांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणेही खूप गरजेचे आहे. स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता असेल, तर संकटाच्या वेळी त्या स्वतःला वाचवू शकतात. पण फक्त महिलांवरच जबाबदारी टाकून चालणार नाही समाजाची मानसिकता बदलणे अधिक आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. एखादी चुकीची घटना दिसली, तर दुर्लक्ष न करता त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. “मला काय करायचं?” हा विचार सोडून “हे चुकीचं आहे” असं ठामपणे सांगितलं पाहिजे. माध्यमांचीदेखील मोठी भूमिका आहे. अशा घटनांची माहिती देताना जबाबदारीने वागणे, समाजात जागरूकता निर्माण करणे आणि योग्य संदेश पोहोचवणे गरजेचे आहे.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं अपहरण आणि बलात्कार यांसारखे गुन्हे थांबवण्यासाठी फक्त कायदे किंवा सरकार पुरेसे नाहीत. यासाठी प्रत्येकाच्या मनात बदल होणे आवश्यक आहे. स्त्रीचा आदर, तिचं स्वातंत्र्य आणि तिची सुरक्षितता यांना महत्त्व दिलं तरच आपण एक सुरक्षित समाज घडवू शकतो.
आज गरज आहे ती केवळ निषेध करण्याची नाही, तर कृती करण्याची आहे. प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं तरच हा अंधार दूर होईल.

- वर्धा हरमलकर, भांडोळ