“कोणीच मला समजत नाही” मुलींमधील किशोरवयीन मनाची अवस्था

“कोणीच मला समजत नाही” ही केवळ एक भावना नाही, तर ती एक मदतीची हाक आहे. या हाकेला दुर्लक्ष न करता, समजून घेणं, आधार देणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हे प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजाचं कर्तव्य आहे.

Story: आरोग्य |
10th April, 09:36 pm
“कोणीच मला समजत नाही”  मुलींमधील किशोरवयीन मनाची अवस्था

साची दहावीत शिकणारी मुलगी. अभ्यासात तशी हुशारच, पण हल्ली खूप अबोल झाली होती. आईने काही विचारलं की तिचं एकच उत्तर, “सगळं ठीक आहे.” मित्रमैत्रिणींसोबतही ती पूर्वीसारखी हसत-खेळत नव्हती. आरशासमोर उभी राहून ती स्वतःकडे पाहत म्हणायची, “मी अशी का दिसते? कोणीच मला समजत नाही...” ही सांचीची कथा असली तरी ती आजच्या अनेक किशोरवयीन मुलींच्या मानसिक स्थितीचे वास्तव आहे.

किशोरावस्था ही मुलींसाठी अत्यंत संवेदनशील टप्पा असतो. या काळात शरीरात होणारे बदल, हार्मोन्समधील चढ-उतार आणि भावनिक अस्थिरता यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मासिक पाळीची सुरुवात, शरीरयष्टीतील बदल, वजन वाढणं किंवा त्वचेवरील बदल या सगळ्यामुळे मुलींमध्ये आत्मभान (सेल्फ कौन्शीयसनेस) वाढतं. त्या स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात आणि जर अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर न्यूनगंड निर्माण होतो व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे यादरम्यान किशोरवयीन मुलींमधील मानसिक आरोग्य समजून घेणे आणि त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

“मी सुंदर दिसते का?”, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतील?” हे प्रश्न सतत मनात घोळत राहतात. सोशल मीडियावर दिसणाऱ्या “परफेक्ट” चेहऱ्यांमुळे आणि शरीरयष्टीमुळे हा ताण आणखी वाढतो. कॅमेरातील फील्टर्स आणि एडीट केलेले फोटो पाहून वास्तव आणि अपेक्षा यामध्ये मोठी दरी निर्माण होते. परिणामी, आत्मविश्वास कमी होतो आणि “मी पुरेशी नाही.. चांगली नाही” अशी भावना वाढीस लागते.

या वयात भावनांचे चढ-उतार खूप तीव्र असतात. कधी खूप आनंदी वाटतं, तर कधी अचानक खूप उदास. छोटीशी गोष्टही मनाला लागते. कधी आई-वडिलांनी केलेली साधी सूचना देखील टीकेसारखी वाटते. त्यामुळे संवादात अंतर निर्माण होतं. मुलींना वाटतं की, “आईला माझं काही कळत नाही” किंवा “कोणीच माझ्या भावना समजून घेत नाही.”

मैत्रीही या टप्प्यात खूप महत्त्वाची असते. बेस्ट फ्रेंड म्हणजे सगळं काही वाटतं. पण कधी मैत्रीत गैरसमज, स्पर्धा किंवा दूरावा आला, तर त्याचा परिणाम मनावर खोलवर होतो. “माझं कोणीच नाही” अशी भावना निर्माण होते. काही वेळा या भावनांमुळे मुली स्वतःमध्येच गप्प बसतात, एकलकोंडी होतात.

याशिवाय, समाज आणि कुटुंबाच्या अपेक्षाही मुलींवर दबाव आणतात. “असं वागू नकोस”, “हे कपडे घालू नकोस”, “तसं बोलू नकोस” अशा सततच्या सूचनांमुळे त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची मोकळीक कमी मिळते. त्यांच्या भावना, स्वप्नं आणि मतं दडल्या जातात. त्यामुळे मनात नाराजी आणि असंतोष वाढतो. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, “कोणीच मला समजत नाही” ही भावना त्यावेळी खरी वाटली, तरी ती कायमची नसते. योग्य समज आणि संवादाने ती बदलू शकते.

पालकांनी मुलींशी संवाद साधताना त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त सूचना देण्यापेक्षा त्यांचं ऐकणं, त्यांच्या भावनांना मान्यता देणं खूप महत्त्वाचं आहे. “तू चुकीची आहेस” असं म्हणण्याऐवजी “तुला असं का वाटतं?” असा संवाद अधिक परिणामकारक ठरतो. मुलींना सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळालं, तर त्या मोकळेपणाने बोलू लागतात.

मुलींनाही स्वतःच्या भावनांना ओळखणं आणि व्यक्त करणं आधीपासूनच शिकवायला हवं. डायरी लिहिणं, चित्र काढणं, संगीत ऐकणं किंवा आवडत्या छंदांमध्ये वेळ घालवणं, या गोष्टी मन हलकं करायला मदत करतात. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे मानसिक संतुलन राखता येतं.

तसंच, सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नसतं, हे समजून घेणंही गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि खास असते, हे स्वीकारणं ही आत्मविश्वास वाढवण्याची पहिली पायरी आहे.

या सर्व परिस्थितीत “कोणीच मला समजत नाही” ही केवळ एक भावना नाही, तर ती एक मदतीची हाक आहे. या हाकेला दुर्लक्ष न करता, समजून घेणं, आधार देणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हे प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजाचं कर्तव्य आहे. मुलींशी खुल्या मनाने संवाद साधणे, त्यांचे ऐकून घेणे आणि त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना सतत टीका करण्याऐवजी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. “तू ठीक आहेस”, “तुझं मत महत्त्वाचं आहे” अशा सकारात्मक संदेशांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

तसेच, मुलींना भावनांचे व्यवस्थापन शिकवणे, योग, व्यायाम, ध्यान यासारख्या सवयी लावणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवश्यक असल्यास समुपदेशन किंवा तज्ञांची मदत घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर