कारापूर-सर्वण येथील बांधकाम प्रकल्पाच्या अनियमिततेची चौकशी करा : ग्रामस्थांची मागणी

गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
कारापूर-सर्वण येथील बांधकाम प्रकल्पाच्या अनियमिततेची चौकशी करा : ग्रामस्थांची मागणी

पणजी : कारापूर-सर्वण (Karapur-Sarvan)  येथे येऊ घातलेल्या गृह निर्माण बांधकाम प्रकल्पाबाबत (Housing Project) पंचायत प्रतिनिधी व अधिकारी, कोमुनिदाद अधिकारी (Comunidade  Officer) यांच्याकडून अनियमितता करण्यात आल्या आहेत. याबाबत सखोल चौकशी करावी; अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

याबाबत ग्रामस्थांनी गुरुवारी पंचायत संचालकांना (Panchayat Director) तक्रार दिली. प्रकल्पाचे काम थांबवण्याबाबत हस्तक्षेप करणे, सरपंच, उपसरपंच आणि पंचायत सचिव यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करणे; अशा प्रकारच्या दहा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी आझाद मैदानात (Azad Maidan)  आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

यासंदर्भात डॉ.स्वप्नील सालेलकर यांनी सांगितले की, मागील ३३ दिवस आम्ही आंदोलन करत आहोत. आज आम्ही खात्याच्या संचालकांना पंचायत राज कायदा १९९४ कायद्याअंतर्गत काम न करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, सचिव यांच्यावर ग्रामसभा ठराव दाबून ठेवणे, भ्रष्टाचार करणे, अवैध परवाने देणे, अधिकारांचा अयोग्य वापर करणे अशा गोष्टींसाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. माजी सरपंचांनी राजीनामा दिल्यावर सध्या आयशा बी यांच्याकडे हा ताबा आहे. मात्र ग्रामसभेच्या काम थांबवा ठरावावर त्या स्वाक्षरी करत नाहीत. पंचायत सचिव देखील सुट्टीवर गेले आहेत. 

ग्रामसभेत १७ मुद्द्यांवरून ५ ठराव संमत 

एकूणच याबाबत चालढकल करण्यात येत आहे. आमची ग्रामसभा १९ एप्रिल रोजी झाली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी काढण्यात आलेली काम थांबवा नोटीस योग्य पद्धतीने ड्राफ्ट करण्यात आलेली नव्हती. यामुळे आम्ही त्यांना योग्य ड्राफ्ट करून दिला होता. मात्र यावर स्वाक्षरी करणारेच सध्या गायब झाले आहेत. याशिवाय या प्रकल्पासाठी कोमुनिदाद जागेतून अवैध पद्धतीने रस्ता देण्यात आला आहे. ग्रामसभेत १७ मुद्द्यांवरून ५ ठराव संमत झाले होते. प्रकल्पाला नोटीस देताना या मुद्द्यांचा आणि ठरावांचा उल्लेख होणे आवश्यक असल्याची मागणी आम्ही केल्याचे सालेलकर यांनी सांगितले. 

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, मागील काही वर्षात भाजप सरकार गोव्यातील पर्यावरण नष्ट करण्याच्या मागे लागले आहे. डोंगर, झाडे कापून, जमीन रूपांतरण करून मेगा गृह प्रकल्पांना (Mega Housing Project)  परवानगी देण्यात येत आहे. या विरोधात सर्व गोमंतकीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

हेही वाचा