प. बंगालमधील पनिहाटीत बॉम्बस्फोट; भाजपचे पाच कार्यकर्ते गंभीर जखमी

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
10 mins ago
प. बंगालमधील पनिहाटीत बॉम्बस्फोट; भाजपचे पाच कार्यकर्ते गंभीर जखमी

प. बंगाल : पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, निवडणुकीनंतरचा हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पनिहाटी परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात भाजपचे पाच कार्यकर्ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, भाजपने थेट तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) निशाणा साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनिहाटी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक २ मधील दत्ता रोडवर गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. भाजपचे काही कार्यकर्ते स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना दोन दुचाकींवरून चार अज्ञात इसम तिथे पोहोचले. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांच्या दिशेने एकापाठोपाठ एक असे तीन देशी बॉम्ब फेकले. बॉम्बस्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळून उडाली आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

या हल्ल्यात पाच कार्यकर्ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तातडीने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच खारदाह पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

ही घटना चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर काही तासांतच घडल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. भाजपने या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचा हात असल्याचा दावा केला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून बंगालमध्ये ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


हेही वाचा