‘लेडी ‌सिंघम’ची गुप्त मोहीम; मध्यरात्री बसस्थानकावर छेड काढणाऱ्यांवर कारवाई

हैदराबादच्या महिला पोलीस आयुक्तांच्या सापळ्यात अडकले ४० जण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
‘लेडी ‌सिंघम’ची गुप्त मोहीम; मध्यरात्री बसस्थानकावर छेड काढणाऱ्यांवर कारवाई

हैदराबाद : मलकाजगिरी पोलीस आयुक्त बी. सुमती (Malkajgiri Police Commissioner B Sumathi) यांनी महिलांच्या सुरक्षेचा (women’s safety) प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मध्यरात्री गुप्त मोहीम राबवत धाडसी पाऊल उचलले. एकटी प्रवासी असल्याचे भासवत त्या रात्री १२ ते पहाटे ३ वाजेदरम्यान दिलसुखनगर बसस्थानकावर उभ्या राहिल्या. काही मिनिटांतच अनेक पुरुषांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.

काही जण दुचाकींवरून जात अश्लील टिप्पणी करू लागले, तर काहींनी त्यांच्या भोवती फेरफटका मारत आक्षेपार्ह प्रश्न विचारले. मात्र, संबंधितांना याची कल्पना नव्हती की परिसरात सिव्हिल ड्रेसमध्ये (Civil dress)  एसआय (SI) आणि निरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी (Police officer)  तैनात असून; संपूर्ण कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

या विशेष मोहिमेदरम्यान महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या सुमारे ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्वांचे समुपदेशन करून सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.

महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारींनंतर मोहीम 

दिलसुखनगर परिसरात विशेषतः रात्री महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारी वाढल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. १ मे रोजी मलकाजगिरी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुमती यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले होते. परिसरातील वसतिगृहांच्या आसपास रात्री मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तरूणांकडून महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे पोलिसांच्या पाहणीत समोर आले होते.

परिस्थिती अनुभवण्यासाठी पोलीस आयुक्त मैदानात

केवळ अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवण्यासाठी पोलीस आयुक्त सुमती यांनी स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या धाडसी आणि सक्रिय भूमिकेचे सोशल मीडियावरही मोठे कौतुक होत असून; अनेकांनी त्यांना “लेडी सिंघम” (Lady Singham) अशी उपमा दिली आहे.

हेही वाचा