डीएमके, एआयएडीएमके मध्ये युतीसाठी पडद्यामागे चर्चा; टीव्हीकेचे आमदार मामल्लपुरम रिसॉर्टमध्ये

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर (Tamil Nadu Assembly Election) सरकार स्थापनेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ला (Resort Politics) सुरूवात झाली आहे. एआयएडीएमकेने आपल्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांना शेजारच्या पुद्दुचेरी येथे हलवले असल्याची माहिती समोर आली आहे.
एआयएडीएमकेने (AIADMK) वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सी. व्ही. शणमुगम यांनी पुद्दुचेरीतील एका आलिशान रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर खोल्यांची व्यवस्था केल्याचे वृत्त आहे. पक्षाचे प्रवक्ते कोवाई सत्यन यांनी आमदारांना पुद्दुचेरीत ठेवण्यात आल्याची पुष्टी केली. मात्र किती आमदार तिथे आहेत किंवा त्यामागील नेमके कारण काय, याबाबत त्यांनी भाष्य केले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षप्रमुख एडप्पडी के. पलानीस्वामी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शणमुगम यांनी ‘द शोर त्रिश्वम’ या लक्झरी रिसॉर्टमध्ये २० हून अधिक खोल्या आरक्षित केल्या आहेत. निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये विरोधी पक्षांकडून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी एआयएडीएमकेने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, एआयएडीएमकेने विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK, टीव्हीके) पक्षाला पाठिंबा देण्याच्या शक्यतेचे खंडन केले आहे. टीव्हीके १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तरी बहुमतापासून दूर राहिला आहे. काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे.
डीएमके, एआयएडीएमकेच्या जागा
सध्याच्या आकडेवारीनुसार डीएमकेकडे (DMK) ५९, एआयएडीएमकेकडे ४७ जागा आहेत. तर पीएमके (४), आययूएमएल (२), सीपीआय (२), सीपीआय(एम)) (२) आणि व्हीसीके (२) या पक्षांच्याही जागा सरकार स्थापनेत महत्त्वाच्या ठरणार आहेत. भाजप, डीएमडीके आणि एएमएमकेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
टीव्हीकेचे आमदार मामल्लपुरम रिसॉर्टमध्ये
राज्यातील राजकीय अस्थिरतेदरम्यान टीव्हीकेने आपल्या आमदारांना मामल्लपुरम येथील रिसॉर्टमध्ये हलवले आहे.
डीएमके, एआयएडीएमके मध्ये युतीसाठी पडद्यामागे चर्चा
दुसरीकडे डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात संभाव्य युतीबाबत पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद १०६ जागांपर्यंत पोहोचत असल्याने सरकार स्थापनेच्या समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार
डीएमकेचे मित्रपक्ष असलेल्या व्हीसीके आणि डाव्या पक्षांची भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार असून, तमिळनाडूतील सत्तासंघर्ष अधिकच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.