चंद्रनाथ रथ हत्या प्रकरण; बंगालमध्ये 'सुडाचे राजकारण'

धावत्या गाडीला घेराव घालून दुचाकीस्वारांनी केला अत्याधुनिक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार; हे काम प्रोफेशनल शूटर्सचे : बंगाल पोलीस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
चंद्रनाथ रथ हत्या प्रकरण; बंगालमध्ये 'सुडाचे राजकारण'

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील (West Bengal Assembly Election) भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या दोन दिवसांत हिंसाचाराची मोठी घटना समोर आली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांचा १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पुर्वनियोजीत रेकी करून खून केल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. तृणमूल कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. 

माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे कारमधून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. कारचा वेग कमी होताच आरोपींनी गोळीबार केला. चार गोळ्यांपैकी तीन गोळ्या रथ यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये कारच्या पुढील काचांवर गोळीबाराचे स्पष्ट चिन्ह दिसून आले.

या हल्ल्यात रथ यांचे चालक बुद्धदेब हेही जखमी झाले असून; त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडली तेव्हा सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) स्वतः त्यांच्या पीएसोबत नव्हते, अशी माहिती त्यांचे बंधू दिव्येंदू अधिकारी यांनी दिली.

सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक

चंद्रनाथ रथ (Chandranath Rath) हे अनेक वर्षे सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत कार्यरत होते. राजकीय समन्वयासह विविध महत्त्वाची कामे ते सांभाळत होते आणि अधिकारी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते.

पूर्वनियोजित रेकी करून खून : सुवेंदू अधिकारी 

घटनेनंतर सुवेंदू अधिकारी तातडीने मध्यग्राम रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी या हत्येला “थंड डोक्याने केलेला खून” असे संबोधत आरोपींनी पूर्वनियोजित रेकी केल्याचा आरोप केला. “ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून आम्ही तिचा तीव्र निषेध करतो,” असे अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

भाजपची सीबीआय चौकशीची मागणी; तृणमूल कॉंग्रेसवर गंभीर आरोप

भाजपने (BJP)  या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची (CBI inquiry)  मागणी करत तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते निखिल प्रसून यांनी, “ही घटना राज्यातील हिंसक राजकारणाचे प्रतीक आहे. या हत्येमागे मोठे षड्यंत्र असू शकते,” असा दावा केला.

तृणमूल कॉंग्रेसच्या हिंसक संस्कृतीचे प्रतीक : निखिल प्रसुन 

“ही घटना गेल्या अनेक वर्षांपासून तृणमूल काँग्रेसने जोपासलेल्या हिंसक संस्कृतीचे प्रतीक आहे. अत्यंत निर्दयीपणे ही हत्या करण्यात आली असून; या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय आहे,” असे भाजप नेते निखिल प्रसुन ( Nikhil Prasun) यांनी मिडियाशी बोलताना सांगितले. 

निर्दोष व्यक्तीची हत्या : देवदास मोंडल 

भाजप नेते देवदास मोंडल ( Devdas Mondal ) यांनी तृणमूल काँग्रेसवर “निर्दोष व्यक्तीची हत्या” केल्याचा आरोप केला. “आरोपींची ओळख पटवून त्यांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देऊ,” असे त्यांनी मिडियाशी बोलताना सांगितले.

तृणमूल कॉंग्रेसचा पलटवार 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही (TMC)  या हत्येचा निषेध केला असून, “भाजप समर्थित दंगेखोर राज्यात निवडणुकीनंतर हिंसाचार भडकवत आहेत,” असा पलटवार केला आहे.

निवडणुकीनंतरच्या हिंसाचारानंतर ८० जणांना अटक: पोलीस आयुक्त 

कोलकाता पोलीस आयुक्त अजय कुमार नंद यांनी सांगितले की, निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत ८० जणांना अटक करण्यात आली असून; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना सुरू आहेत.

सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा भवानीपूर मतदारसंघात १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केल्यानंतर त्यांना “जायंट किलर” अशी ओळख मिळाली आहे. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.

हेही वाचा