गव्या रेड्याच्या हल्ल्यात होमगार्डचा मृत्यू; प्राथमिक तपासात स्पष्ट

पोलीस अधीक्षकांची माहिती : वन खात्याच्या दाव्यानंतर माजली होती खळबळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12th May, 03:19 pm
गव्या रेड्याच्या हल्ल्यात होमगार्डचा मृत्यू; प्राथमिक तपासात स्पष्ट

मडगाव : पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार तसेच शवचिकित्सा अहवालानुसार होमगार्ड दिनेश गावडे याचा मृत्यू गव्या रेड्याच्या हल्ल्यात झाल्याचे समोर आलेले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

वन खात्याच्या (Forest Department)  दाव्यानंतर उसगाव येथील होमगार्ड (Goa Home Guard) दिनेश तुळशीदास गावडे (४८ वर्षे) यांच्या मृत्यू प्रकरणाला नवीन वळण आले होते. मात्र, शवचिकित्सा अहवालाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे सांगत डॉ. मधु घोडकिरेकर यांनी वन खात्याच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली होती. आता दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी गावडे यांचा मृत्यू हा गव्या रेड्याच्या हल्ल्यामुळेच झालेला आहे, असे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 पोलीस अधीक्षक देसाई यांनी सांगितले की, होमगार्ड गावडे याच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. शवचिकित्सा अहवालात गावडे यांचा मृत्यू हा शिंगाच्या झालेल्या जखमांमुळेच झाल्याचे स्पष्ट आहे. त्याशिवाय या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींनीही माहिती दिलेली असल्याने गावडे यांचा मृत्यू हा गव्या रेड्याच्या हल्ल्यामुळेच झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यापुढील तपास सुरू  असून; आणखी काही असल्यास समोर येईल. पण चौकशीदरम्यान, शवचिकित्सा अहवालातील माहिती व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार गावडे यांचा मृत्यू गव्या रेड्याच्या हल्ल्यात झाल्याचा निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. यापुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले. बेतोडा बायपास जंक्शनजवळ दिनेश गावडे याच्यावर गव्या रेड्याने हल्ला केला होता.

यात जखमी होमगार्ड गावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर वन खात्याकडून या घटनेबाबत शंका उपस्थित केली होती. घटनास्थळी गव्याच्या पाऊलखुणा किंवा शेण आढळले नसल्याचा दावा करत; त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडे केली. यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील (South Goa District Hospital)  फॉरेन्सिक विभागाचे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी पत्रक काढून वन खात्याचे दावे फेटाळले.

जखमांचे स्वरूप हे गव्याच्या शिंगाच्या प्रहारासारखेच असून; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वन खात्याकडून निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे म्हटले. याशिवाय दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून शवचिकित्सा अहवाल समाजमाध्यमांवर व्हायरल असून; गोपनियतेचा भंग करण्यात आल्याचे स्पष्ट करीत; चौकशीची मागणी केली होती.

हेही वाचा