‘डायनामो नाईट क्लब’ला हणजूण पंचायतीकडून नोटीस

क्लबची अनधिकृत बांधकामे पाडण्याविषयी सुतो​वाच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
‘डायनामो नाईट क्लब’ला हणजूण पंचायतीकडून नोटीस

म्हापसा : हणजूण येथील वादग्रस्त नाईटलाईफ केंद्र असलेल्या ‘डायनॅमो क्लब’ला हणजूण-कायसुव पंचायतीने जोरदार दणका दिला आहे. क्लबच्या आवारात करण्यात आलेल्या कथित अनधिकृत बांधकामांप्रकरणी पंचायतीने व्यवस्थापनाला औपचारिक ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, ही बांधकामे का पाडली जाऊ नयेत, अशी विचारणा केली आहे.
पंचायत उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण क्रमांक २१३ मधील या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल, पंचनामा आणि कच्च्या नकाशावरून असे स्पष्ट झाले आहे की, पंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या ठिकाणी तात्पुरती कॉटेजेस आणि 'रेस्ट्रो लाउंज' उभारण्यात आले आहे. गोवा पंचायत राज अधिनियमाच्या कलम ६६(३) नुसार, ग्रामपंचायतीच्या लेखी परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम किंवा विस्तार करणे बेकायदेशीर ठरते.
पंचायतीने क्लबचे प्रतिनिधी अँटोनियो साल्वाडोर कस्टोडिओ डी ब्रिटो यांना नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण आणि आवश्यक परवाने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी २२ मे रोजी दुपारी ३.३० वाजता पंचायत कार्यालयात होणार आहे. निर्धारित वेळेत योग्य उत्तर किंवा कागदपत्रे सादर न केल्यास, संबंधित बांधकामे अनधिकृत मानून कोणतीही पूर्वसूचना न देता ती मालकाच्या खर्चाने पाडून टाकली जातील, असा सज्जड दम पंचायतीने दिला आहे.
स्थानिकांच्या तक्रारींची दखल
‘डायनॅमो क्लब’विरोधात मोठ्या आवाजातील संगीत आणि ध्वनी प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. किनारपट्टी भागात अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर प्रशासनाने कडक नजर ठेवली असतानाच, पंचायतीने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पंचायत बैठकीतील ठरावानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा