चिंचणीत संतप्त लोकांनी फोडले वीज कार्यालयाचे दार

तीन दिवस वीज खंडित : कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांचा राग अनावर


6 hours ago
चिंचणीत संतप्त लोकांनी फोडले वीज कार्यालयाचे दार

चिंचणीतील संतप्त ग्रामस्थांनी वीज कार्यालयाचे फोडलेले दार.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : वादळी वार्‍यासह आलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे सासष्टीतील चिंचणी परिसरात अनेक ठिकाणी झाडे व वीज खांब कोसळून पडले. यामुळे मागील तीन दिवस या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला. कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयाचे दार फोडले.
चिंचणी गावात तीन दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या पावसामुळे गावातील अनेक झाडे आणि विजेचे खांब मुळापासून उखडून पडले. संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. वेळ्ळी भागात तीन दिवसांपूर्वीच रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला; पण चिंचणीत वीज खांब पडल्याने वीज पुरवठा बंद राहिला. या ठिकाणी शेतातून गेलेल्या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याची मागणी गेल्यावर्षी करण्यात आली होती; पण त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. वीज खांब पडल्याने अनेक भागात मागील तीन दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.
चिंचणीच्या विविध भागातून वीज कर्मचार्‍यांना कॉल्स करण्यात येत होते; पण कर्मचार्‍यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. पंचायतीकडून वीज कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या मोबाईलवरही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच रात्री चिंचणीतील वीज कार्यालयात तक्रारीसाठी आल्यानंतर त्याठिकाणी दरवाजा बंदावस्थेत आढळून आला. तीन दिवसांपासून वीज खंडित असल्याने आधीच नाराज असलेल्या नागरिकांचा राग अनावर झाला व त्यांनी चिंचणीतील वीज कार्यालयाचा दरवाजा तोडला.
प्रतिसाद न मिळल्यामुळेच लोकांची कार्यालयाकडे धाव
पंच वालेंतिनो बार्रेटो यांनी सांगितले की, जनता आणि वीज कर्मचारी यांच्यात विसंवाद निर्माण झाला आहे. तीन दिवसांपासून गावातील अनेक भागात वीज खंडित आहे. पंचायतीकडून वीज कर्मचार्‍यांना मोबाईल दिले असून खात्याचेही मोबाईल त्यांच्याकडे आहेत. उष्मा वाढलेला असून गर्मीने लोक हैराण झाले आहेत. आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला; पण तासाभरात वीज खंडित झाली ती आलीच नाही. त्यानंतर कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला नाही व कार्यालयाकडे जमाव झाला. संतप्त नागरिकांनी कार्यालयाचे दार फोडून राग व्यक्त केला.

हेही वाचा