११ वर्षीय मुलाचा पाय गमवावा लागल्यास कारणीभूत असल्याचा ठपका

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गँगरीनमुळे ११ वर्षीय मुलाला पाय गमवावा लागल्याच्या प्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याने वाळपई आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. यवंती गावडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश आरोग्य सहसचिव प्रणब भट यांनी जारी केला आहे. या प्रकरणी तज्ज्ञ समितीकडून सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. गावडे यांचे निलंबन कायम राहणार आहे. निलंबनाच्या काळात डॉ. गावडे यांना कोणतेही भत्ते व अन्य वेतन मिळणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
२७ एप्रिल रोजी ११ वर्षीय मुलाला वाळपई आरोग्य केंद्राच्या अपघात विभागात आणले होते. पडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. डॉ. यवंती गावडे यांनी त्याची तपासणी करून डाव्या पायाचा एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. त्यात फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. रुग्णाला ऑर्थोपेडिक असिस्टंट म्हणून काम करणारे एमटीएस कर्मचारी सुरेश यांनी प्लास्टर स्लॅब लावला.
२८ एप्रिलला रुग्णाला ताप, उलट्या आणि सुस्तीच्या तक्रारींसह पुन्हा आरोग्य केंद्रात आणले. रुग्णाची तपासणी डॉ. आदित्य गावकर यांनी केली. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन, पुढील उपचारांसाठी त्यांनी तत्काळ गोमेकॉत पाठवले. गोमेकॉतील संबंधित डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या पायाच्या बोटांना सूज आली होती. दुर्दैवाने गँगरीनमुळे बाधित पाय काढावा लागला. तज्ज्ञ समितीच्या निरीक्षणांवरून डॉ. यवंती गवाडे यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. गावडे यांची सेवा अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे.
अंतर्गत तज्ज्ञ समितीने नाेंदवलेली निरीक्षणे
रुग्णावर प्लास्टर स्लॅबची प्रक्रिया साहाय्यक कर्मचाऱ्यांकडून पुरेशा थेट पर्यवेक्षणाशिवाय आणि उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पुनर्मूल्यांकनाशिवाय पार पाडण्यात आली होती.
रुग्णाचे वय व फ्रॅक्चर-संबंधित धोके लक्षात घेऊन सुरुवातीच्या टप्प्यातच तातडीच्या अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार केला जाऊ शकला असता.