पंतप्रधानांचे आवाहन : विदेशी मुद्रा वाचवण्यचा प्रयत्न करा

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
हैदराबाद : ‘वर्क-फ्रॉम-होम’ सुरू करा, इंधन बचत करा आणि परकीय चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोन्याची खरेदी टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे ९,३७७ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान म्हणाले, पेट्रोल, डिझेल दुसऱ्या देशांतून मागवावे लागते. युद्धामुळे जगात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांचे दर गगनाला भिडले आहेत. सरकार दोन महिन्यांपासून देशवासीयांना या संकटांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुरवठा साखळीवर संकट कायम राहील, तर कितीही उपाय केले तरी अडचणी वाढतच जातात. त्यामुळे देशाला प्रथम प्राधान्य ठेवून एकजूट होऊन लढावे लागेल. देशासाठी जगणे आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे ही देशभक्तीच आहे. या जागतिक संकटात आपल्याला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शहरात जिथे मेट्रो आहेत, तिथे केवळ मेट्रोने प्रवास करा. कारमधून जाणे जरूरी असेल तर इतर लोकांनाही सोबत घ्या. सामान पाठवायचे असेल तर ते रेल्वेने पाठवा. इलेक्ट्रिक गाड्या असणाऱ्यांनी त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
वर्क फ्रॉम होमचा सल्ला
आपण करोना संकट काळात वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सारख्या अनेक व्यवस्था विकसित केल्या. आता त्या व्यवस्था पुन्हा सुरू केल्या, तर ते देशाच्या हिताचे होईल. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्सिंग, व्हर्च्यूअल मीटिंग्स यांना पुन्हा प्राथमिकता द्यायची आहे. या संकटात विदेशी मुद्रा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जगात पेट्रोल-डिझेल आधीपेक्षा अनेक पटीने महाग झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर जी विदेशी मुद्रा खर्च होते, पेट्रोल-डिझेल वाचवून ती वाचवायची आहे. विदेशात फिरायला जायची संस्कृती वाढत आहे. कमीत कमी पुढच्या एक वर्षापर्यंत विदेशात जाणे टाळा. भारतात फिरू शकता, असेही पंतप्रधान म्हणाले.
वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन
सोने खरेदीमुळे विदेशी मुद्रा खूप जास्त खर्च होते. देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी न करण्याचा निर्णय घ्या. खाद्यतेलाच्या आयातीसाठी खूप मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा खर्च करावी लागते. प्रत्येक कुटुंब खाद्यतेलाचा उपयोग काही प्रमाणात कमी करेल, तरी ते देशभक्तीचे मोठे काम आहे. यामुळे आरोग्यदेखील चांगले राहील. आपण रासायनिक खते आयात करतो. रासायनिक खतांमुळे शेतजमिनीचे नुकसान होते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि नैसर्गिक शेती करा. याने आपण शेत आणि विदेशी मुद्रा वाचवू शकतो, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवाहने
‘वर्क फ्रॉम होम’वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या.
पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा.
पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका.
वर्षभर परदेशी प्रवास टाळा.
कच्चे तेल वाचवण्यावर भर द्या.
परकीय चलन वाचवण्यावर भर द्या, परकीय चलन साठा कमी होऊ देऊ नका.
जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा.
खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा.
परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा