सरकारी नोकरीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक

संशयित महिलेला पोलिसांकडून अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 09:11 pm
सरकारी नोकरीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक

फोंडा : राज्यात यापूर्वी गाजलेल्या ‘जॉब स्कॅम’ने पुन्हा डोके वर काढले असून, सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सुहाना सूजय नाईक (३९, आमोणा) असे या संशयित महिलेचे नाव असून, तिला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी नोकरीचे आमिष

उसगाव भागातील दत्तराज नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील काही जणांना होमिओपॅथिक डॉक्टर, एलडीसी, सरकारी खात्यात चालक आणि अन्य नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यासाठी संशयित महिलेने त्यांच्याकडून अंदाजे १८ लाख रुपये घेतले. मात्र, नोकऱ्या न मिळाल्याने दत्तराज नाईक यांनी दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली.

पोलिसांत तक्रार दाखल

रक्कम परत देण्याबाबत संशयित महिलेकडून कोणतीही हालचाल न झाल्याने, अखेर याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित महिलेला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. याप्रकरणी उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक मोहन गावडे आणि उपनिरीक्षक बन्सल नाईक अधिक तपास करत आहेत.

यापूर्वीही उघडकीस आलेली प्रकरणे

राज्यात ‘कॅश फॉर जॉब स्कॅम’ प्रकरणातील पहिला गुन्हा यापूर्वी म्हार्दोळ पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला होता. त्यानंतर फोंडा, डिचोली, पर्वरी आणि वास्को भागातील पोलीस स्थानकांमध्येही गुन्हे नोंद झाले होते. मागील प्रकरणांमध्ये पोलिसांनी संशयित महिलांची अनेक वाहने आणि फ्लॅट्स जप्त केले होते.

#GoaNews #JobScam #PondaPolice #CrimeNews #GovernmentJobs #FraudCase #GoaCrime #BreakingNews
हेही वाचा