भंडारी समाजाच्या सर्वसाधारण सभेत समाज प्रमाणपत्रांवरून वाद

गैरवापराचा आरोप : प्रमाणपत्राविषयी कायदेशीर अभ्यास करून घेणार निर्णय


13 hours ago
भंडारी समाजाच्या सर्वसाधारण सभेत समाज प्रमाणपत्रांवरून वाद

भंडारी समाजाच्या आमसभेला उपस्थित सदस्य.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भंडारी समाजाच्या सर्वसाधारण सभेत समाज प्रमाणपत्राच्या गैरवापराचा मुद्दा गाजला. काही सदस्यांनी प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यावर निर्बंध आणण्याची मागणी केली, तर काहींनी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे समर्थन केले.
समाजाचे सदस्य आतीश मांद्रेकर यांच्यासह काही सदस्यांनी समाज प्रमाणपत्रांचा वापर राजकीय आणि इतर कारणांसाठी होत असल्याचा आरोप केला. काही जण पैसे घेऊन किंवा राजकीय दबावाखाली प्रमाणपत्रे दिली जात असल्याचेही बैठकीत मांडण्यात आले. समाज प्रमाणपत्रांविषयी कायदेशीर अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासक एस. व्ही. नाईक यांनी स्पष्ट केले. बैठकीत प्रमाणपत्रांच्या वह्या तालुका समित्यांकडून परत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
भंडारी समाजाचे प्रशासक एस. व्ही. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही आमसभा घेण्यात आली. सभेला १३७ सदस्य उपस्थित होते. उपेंद्र गावक‍र, अमृत आगरवाडेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. भंडारी समाज समितीवर सरकारने सहा महिन्यांसाठी प्रशासकाची नेमणूक केली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आमसभा घेतली जाते. त्याप्रमाणे ही आमसभा घेण्यात आली.
गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सर्वसाधारण सभा घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीसंदर्भातील काही याचिका अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणुकीवरील चर्चा टाळून इतर विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.


मतदार यादी तपासणीसाठी समित्या
भंडारी समाजाच्या मतदार यादीत सध्या ३,९१४ नावे आहेत. या यादीची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समित्या स्थापन करण्यात आल्या असून बार्देश आणि फोंडा येथे तीन सदस्यीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. हरकतींची चौकशी करून अंतिम मतदार यादी पुढील बैठकीत निश्चित केली जाणार आहे. सध्या यादीबाहेरील सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे प्रशासक नाईक यांनी स्पष्ट केले.
आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण
२०२१ ते २०२६ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण (ऑडिट) अद्याप झाले नसल्याचे सभेत सांगण्यात आले. मडगाव आणि म्हापसा येथील समाज सभागृहांच्या उत्पन्न व वापराचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा