दिनेश गावडे यांच्या मृत्यूप्रकरणी वन खात्याचे दावे चुकीचे !

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाकडून स्पष्टीकरण


13 hours ago
दिनेश गावडे यांच्या मृत्यूप्रकरणी वन खात्याचे दावे चुकीचे !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : होमगार्ड दिनेश गावडे यांच्या मृत्यूबाबत वन खात्याचे निष्कर्ष चुकीचे आहेत. शवचिकित्सा अहवालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाने दिले आहे. तसेच गोपनीय वैद्यकीय अहवाल समाजमाध्यमांत व्हायरल झाला असल्याने चौकशीची मागणीही केली आहे.
बेतोडा येथील होमगार्ड दिनेश गावडे यांच्या मृत्यूबद्दल वन खात्याने काढलेले निष्कर्ष चुकीचे असल्याचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाने स्पष्ट केले. वन खात्याने पोलीस खात्याला पाठवलेल्या पत्राचा आधार घेऊन एका वर्तमानपत्राने गावडे यांच्यावर गव्याने हल्ला केला नसून त्यांचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाने स्पष्टीकरण दिले आहे. यात हा मृत्यू गव्याच्या हल्ल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट असल्याचे म्हटले आहे.
फॉरेन्सिक विभागाने १० मे रोजी जारी केलेल्या पत्रकातून वन खात्याच्या दाव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी स्पष्ट केले की, वन विभागाने वैद्यकीय कायदेशीर सल्ला न घेता शवविच्छेदन अहवालाचा चुकीचा अर्थ लावला आहे. शवविच्छेदनावरून असे निष्कर्ष काढण्याचा अधिकार वन खात्याला नाही. शवविच्छेदन अहवालाच्या प्रसारीत प्रतीवर आधारित शंका दूर करण्यासाठी, होमगार्डचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचा सिद्धांत आणि शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष यांच्यातील विसंगतीबद्दल वन विभागाचा दावा, तसेच त्यांचे अन्वयार्थ अशास्त्रीय असल्याचे स्पष्ट करणे हाच आहे. होमगार्डच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप आणि त्यामुळे झालेली अंतर्गत हानी ही शिंगाच्या जखमेसारखी आहे, जी गव्याच्या हल्ल्यामुळे होऊ शकते. अहवालावरून वन विभागाच्या अधिकार्‍यांना निष्कर्ष काढण्याचा अधिकार नाही. वास्तविक पाहता, या प्रकरणात मृतदेहावरील जखमा व झालेली हानी गाय किंवा बैलाच्या हल्ल्यापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे सर्व काही स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
इस्पितळाची चौकशीची मागणी
वैद्यकीय अहवाल अत्यंत गोपनीय असताना तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला, याबद्दल इस्पितळाकडून चिंता व्यक्त करण्यात आली. हा तपासाच्या गोपनीयतेचा भंग असून याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शीने कथन केली घटना 

दिनेश यांचे मित्र देविदास गावकर यांनी सांगितले की, दिनेश त्या दिवशी मला भेटायला आला होता. परत घरी जात असताना त्याच्यावर गव्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर गवा डोंगरावर धावत गेला. मी ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि दिनेशला रुग्णालयात हलवले.

वन खात्याने दिनेश गावडे यांच्या मृत्यूप्रकरणात गव्याला क्लिनचीट देऊन दिनेश गावडे यांच्या कुटुंबियांचा नुकसानभरपाईचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
_ मधू घोडकिरेकर, प्रमुख, फॉरेन्सिक विभाग 

हेही वाचा