नोकरीऐवजी व्यवसायांना प्राधान्य दिल्यास परप्रांतीयांचे लोंढे थोपविणे शक्य!

मुख्यमंत्री : साखळीत ‘उद्योग संगम’ कार्यशाळा


08th May, 11:49 pm
नोकरीऐवजी व्यवसायांना प्राधान्य दिल्यास परप्रांतीयांचे लोंढे थोपविणे शक्य!

उद्योजक सुरेश पाटील यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
..
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : गोमंतकीय युवांना उद्योजक बनविण्यासाठी, तसेच उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नरत आहेत. गोमंतकीय युवा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज बाहेरील लोकांची गोव्यात ‘दुबई’ झाली आहे. पारंपरिक व्यवसायांवर बाहेरील लोक अतिक्रमण करून हस्तगत करू लागले आहेत. त्यासाठी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय सुरू करण्याची भावना मनात आणावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ‘नवीन संधीचा शोध’ हा विशेष कार्यक्रम उद्योग, व्यापार व वाणिज्य खात्याद्वारे ‘उद्योग संगम’ कार्यशाळा साखळीत आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर औद्योगिक, व्यापार व वाणिज्य संचालनालयाचे संचालक अश्विन चंद्रू, एमएसएमई डीएफओ गोवाचे उपसंचालक डी. आर. जोहरी, एसएमई एसबीआयचे साहाय्यक सरव्यवस्थापक डी. प्रसाद, केव्हीआयसी एमएसएमई केंद्रीय मंत्रालयाचे साहाय्यक संचालक प्रमोद आंबटकर व इतर उपस्थित होते. कार्यक्रमात गोव्यातील उदयोन्मुख उद्योजक सुरेश पाटील, शिरीष साळुंखे, रत्नदीप सावंत व अंजली बर्वे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिबिरात उपस्थित विद्यार्थी, नवीन उद्योजक, तसेच प्रस्थापित उद्योजकांना उपस्थित मार्गदर्शक वक्त्यांकडून नवीन उद्योगांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, आर्थिक साहाय्य, उत्पादनाची जाहिरातबाजी, विक्रीची पद्धत व इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
उद्योजक होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक
युवा उद्योजक तयार करण्यापासून त्यांना आर्थिक साहाय्य, उत्पादन वाढविण्याचे मार्गदर्शन, तांत्रिक शिक्षण, उत्पादन विक्रीसाठी जाहिरातबाजीपर्यंत सरकार सहकार्य करते. केवळ दृष्टिकोन सकारात्मक व जिद्द ठेवणे आवश्यक आहे. गोव्यात प्लंबिंग, इलेक्ट्रिक कंत्राटदारांची गरज आहे. या क्षेत्रात तसेच पर्यटन क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. परंतु लहान सहान कामांसाठी बाहेरील लोकांना आणावे लागते. गोव्यात काम खूप असल्याने बाहेरील व्यवसायिक आपल्या लोकांना गोव्यात आणून काम करून घेत आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.