सुवेंदू अधिकारीच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री; आज शपथविधी

अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब


08th May, 11:40 pm
सुवेंदू अधिकारीच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री; आज शपथविधी

मुख्यमंत्रिपदी घोषणा केल्यानंतर सुुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली. सायंकाळी अधिकारी यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचा शपथविधी शनिवार, ९ रोजी कोलकाता येथे सकाळी ११ वा. होणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांनी एकमताने अधिकारी यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपचे सरकार स्थापन होत असून, अधिकारी यांची निवड ऐतिहासिक मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश पेक्षा जास्त जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले आहे.
राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. ७ मे रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी १७ वी विधानसभा विसर्जित केली होती. त्यासोबतच ममता बॅनर्जी यांचे सरकारही अधिकृतपणे बरखास्त झाले. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता, मात्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने राज्यपालांनी घटनात्मक पाऊल उचलत विधानसभा बरखास्त केली. यामुळे शनिवारपासून बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तारूढ होणार आहे. कोलकाता येथे शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून, देशातील अनेक बडे नेते सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सुवेंदू अधिकारी ?
सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा सलग दोनवेळा पराभव केला. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये आणि यंदाच्या निवडणुकीत थेट ममतांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूरमध्ये जाऊन त्यांना धूळ चारली.
भाजपला २०७ जागांपर्यंत पोहोचवण्यात अधिकारी यांचा मोठा वाटा आहे. त्यांना बंगालचा ‘किंगमेकर’ मानले जात आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी विधानसभेत केलेली कामगिरी आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.