कुजलेल्या स्थितीत सांगाडा मिळाल्याने मृत्यूचे कारण अस्पष्ट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : साकोर्डे जंगलात सांगाडा मिळालेल्या वाघाची शिकार झालेली नाही. सांगाडा कुजलेल्या स्थितीत मिळाल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नाही, असा अहवाल वन खात्याने सरकारला सादर केला आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी अहवालातील ही माहिती उघड केली.
साकोर्डे जंगलात २ मे रोजी वाघाचा सांगाडा मिळाला होता. त्या परिसराची पाहणी वन खात्याच्या जवानांनी केली. तेथे तारा, वायरी किंवा बंंदुकीच्या गोळ्या मिळालेल्या नाहीत. सांंगाड्याच्या तपासणीत वाघाच्या अवयवांत तारा वा गोळ्यांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. वीषबाधाही झालेली नाही. वाघाच्या मृत्यूनंतर तीन आठवड्यांनी सांगाडा मिळाला. अवयवांंचे नमुने डीएनए आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. मृत्यच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन झाली आहे. तज्ज्ञ समितीचा अहवालही अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती वन अधिकारी जीस वर्की यांनी दिली.
वाघाचे वय झाल्याने त्याला नैसर्गिक मृत्यू आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. साकोर्डे भागात शिकारींचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाघाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता; मात्र वन खात्याने शिकार झाल्याचे नाकारले आहे.
फॉरेन्सिक, डीएनए अहवाल प्रलंबित
साकोर्डे जंगलात वाघाच्या चमड्याचे दोन भाग सापडले होते. त्याचा वन खात्याने पंचनामा केला. वाघाचा मृत्यू झाल्याचे निश्चित आहे. वय झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वाघाच्या अवयवांचा फॉरेन्सिक आणि डीएनए अहवाल अद्याप आलेला नाही.