पश्चिम बंगालचे मंत्रिमंडळ राज्यपालांकडून बरखास्त

ममता बॅनर्जींचा राजीनाम्यास नकार : नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th May, 10:54 pm
पश्चिम बंगालचे मंत्रिमंडळ राज्यपालांकडून बरखास्त

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्यपालांनी राज्याचे मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. ही संपूर्ण कारवाई घटनात्मक प्रक्रियेनुसार करण्यात आली असून, आता त्यांना राजीनामा देण्याची आवश्यकता उरलेली नाही. संविधानानुसार विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यानुसार विद्यमान विधानसभा ८ मे २०२१ ते ७ मे २०२६ या काळात अस्तित्वात होती. नव्या विधानसभेच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे जुनी विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांचे निवडणूक निकालावर गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनादेश नसून ती एक मोठी कटकारस्थाने आहेत, असा आरोप करत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी (६ मे) नकार दिला, तसेच रस्त्यावर उतरून लढा देणार असून विरोधी ‘इंडी’ आघाडीला अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका

तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक लढवली नसून त्यांची लढाई भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशी होती. आपला पराभव जनतेच्या जनादेशाने झालेला नसून एका कटांतर्गत झाला आहे, आपण हरलेलो नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि आपण लोकभवनात जाणार नाही. सुमारे १०० जागांवर जनादेश लुटला गेला असून पक्षाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक मतमोजणी संथ गतीने करण्यात आली, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

आगामी राजकीय दिशा आणि विरोधी ऐक्याचा निर्धार

राज्यातील पराभवानंतर आता राष्ट्रीय स्तरावर विरोधी आघाडीला बळकट करण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी फोन करून एकता व्यक्त केली असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही त्यांच्याशी संवाद साधला आहे. सत्तेत असेपर्यंत आपण खूप काही सहन केले, मात्र आता आपण एक मुक्त पक्षी आणि सामान्य नागरिक असून रस्त्यावर उतरून सर्व अन्यायाविरुद्ध लढा देणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

कोलकात्यात भाजपच्या पहिल्या सरकारचा भव्य शपथविधी

पश्चिम बंगालमधील भाजपच्या पहिल्या सरकारचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर होणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे ४,००० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. या भव्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपशासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

#WestBengalElection #MamataBanerjee #BJP #BreakingNews #Kolkata #PoliticalUpdates #IndiaNews