अंधारामुळे थांबले शोधकार्य; सकाळी होणार पुन्हा सुरू

ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदी.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीत रविवारी सायंकाळी मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेला इम्तियाज हुसेन (२१, लडाख) हा युवक बुडाला. इम्तियाज हा फर्मागुडी येथील आयआयटीचा विद्यार्थी आहे. माहिती मिळाताच फोंडा पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता युवकाचा शोध घेतला. रात्री शोध कार्य थांबवण्यात आले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.
रविवारी दुपारी ८ विद्यार्थ्यांचा गट नदीवर आंघोळीसाठी आला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे इम्तियाज बुडाला. सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्वरित फोंडा पोलीस व अग्निशमन दलाला फोनवरून माहिती दिली. तातडीने फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. अंधार पसरल्याने रात्री शोध मोहीम थांबवावी लागली.
आदेश धुडकावणाऱ्यांवर कारवाई करा
राज्यातील विविध नदी, कालवा, धबधबा, तळीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नदीवर आंघोळ करण्यासाठी बंदी लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. यासाठी जबाबदारी निश्चित करून नदीत आंघोळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच असे प्रकार थांबतील, असे नागरिकांतून बोलले जात आहे.