फॉरेन्सिक विभागाचे डॉ. घोडकिरेकर यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार

मृत दिनेश गावडे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : होमगार्ड दिनेश गावडे याच्या मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालाची गोपनीयता वन खात्याकडून भंग झाल्याचा आरोप दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या फॉरेन्सिक विभागाने केला आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन अहवाल हा सार्वजनिक दस्तावेज नसतो. वन खात्याने हा अहवाल आणि त्यावर केलेली टिपणी सोशल मीडियावर कशी पोहोचली, याचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. वन खाते वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे दावे फेटाळण्यासाठी वारंवार असे प्रयत्न करत असून यामुळे पोलीस तपासात अडथळा निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मृत व्यक्ती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने चुकीची माहिती पसरवणे हा त्यांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार आहे. मृताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई नाकारण्यासाठीच हा संभ्रम निर्माण केला जात असल्याचा संशयही या तक्रारीतून व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ. घोडकिरेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि गोवा अनुसूचित जातीजमाती आयोगाकडे केली आहे. संवेदनशील प्रकरणांमध्ये सरकारी अधिकार्यांनी अधिक जबाबदारीने वागावे, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
शवविच्छेदन निष्कर्षांवर अशास्त्रीय टिपणीचा आरोप
दिनेश गावडे यांचे शवविच्छेदन ७ मे २०२६ रोजी करण्यात आले होते. फॉरेन्सिक विभागाच्या दाव्यानुसार, हा अहवाल केवळ पोलिसांना सादर करण्यात आला होता. मात्र, ९ मे रोजी या अहवालाचे स्क्रीनशॉट्स आणि उत्तर गोवा (फोंडा) वन विभागाने पोलीस अधीक्षकांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्रात वन विभागाने शवविच्छेदन निष्कर्षांवर अशास्त्रीय टिपणी केल्याचा आरोप डॉ. घोडकिरेकर यांनी केला.