इंधनाचा पुरेसा साठा : नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीला उपस्थित जे. पी. नड्डा, हरदीपसिंह पुरी, किरेन रिजिजू व इतर.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिगटाची बैठक पार पडली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत देशातील इंधन पुरवठा आणि आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला केंद्रीय आरोग्य व रसायन-खते मंत्री जे. पी. नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह अन्य वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. या बैठकीत पश्चिम आशियातील संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतावर होणारा परिणाम तपासण्यात आला. एलपीजी, पेट्रोल, डिझेल आणि खतांचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली.
बैठकीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जोखमींच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळी आणि आवश्यक वस्तूंच्या देशांतर्गत उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी काम करत आहे. नागरिकांना कोणतीही भीती न बाळगण्याचे कारण नाही. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा असून पंतप्रधान मोदी यांचे आत्मनिर्भरता आणि ऊर्जा सुरक्षेबाबतचे आवाहन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
पेट्रोल-डिझेल, एलपीजीची कमतरता नाही : सुजाता शर्मा
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संकटामुळे जागतिक इंधन पुरवठ्यात निश्चितपणे अडथळा निर्माण झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. तथापि, भारत सरकारने इंधनाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनेक प्रभावी पावले उचलली आहेत. भारताकडे कच्च्या तेलाचा (क्रूड ऑइल) पुरेसा साठा आहे. आमच्या रिफायनरीज पूर्ण क्षमतेने काम करत आहेत आणि त्यात कोणताही अडथळा नाही. देशातील पेट्रोल पंप किंवा एलपीजी वितरक केंद्रावर साठा संपल्याची तक्रार मिळालेली नाही. पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजीचा पुरवठा सातत्याने केला जात आहे.
उपदेश नाहीत, त्यांच्या अपयशाचे पुरावे : राहुल गांधी
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर टीका करताना हे सरकारचे अपयश असल्याचे नमूद केले. राहुल गांधी पोस्टमध्ये म्हणतात, मोदींनी जनतेला सोने खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा, असे सांगितले आहे. हे उपदेश नाहीत, त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत त्यांनी या देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे की, त्यांना जनतेला सांगावे लागत आहे काय खरेदी करा, काय करू नका, कुठे जा, कुठे जाऊ नका. हा देश चालवणे आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या आवाक्यातील गोष्ट राहिलेली नाही.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात..
पंतप्रधानांचे आवाहन देशाच्या हितासाठी महत्त्वाचे.
इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक ताण येत आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्यांना दररोज एक हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना या कंपन्यांनी भारतातील ग्राहकांना इंधन दरवाढीपासून संरक्षण देत पुरवठा स्थिर ठेवला आहे.