मोपा विमानतळ प्रवेशद्वार मार्ग सर्वसामान्यांना बंद केल्याने गैरसोय

स्थानिकांत नाराजी : वाहतुकीसाठी लांब पल्ल्याच्या मार्गाचा अवलंब

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th May, 10:57 pm
मोपा विमानतळ प्रवेशद्वार मार्ग सर्वसामान्यांना बंद केल्याने गैरसोय

पेडणे : गोवा सरकारच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ५ मे रोजी जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे (नोटिफिकेशन) मोपा विमानतळ परिसरातील स्थानिक नागरिक, टॅक्सी चालक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्यांसाठी असलेला प्रवेशमार्ग बंद केल्यास स्थानिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर यांनी दिला आहे.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या नवीन आदेशानुसार, मोपा विमानतळावरील ये-जा आता अत्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या मार्गावरून केवळ शासकीय वाहने, वैध ओळखपत्र असलेले कर्मचारी, पोलीस ठाण्यात जाणारे ग्रामस्थ आणि आपत्कालीन वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठा फटका बसला आहे.
पूर्वी मोपा, धारगळ, उगवे, कासारवर्णे, तांबोसे, तोरसे, इब्रामपूर आणि हळर्ण या भागातील नागरिक काही मिनिटांत विमानतळ परिसरात पोहोचत होते. मात्र, आता हा मुख्य मार्ग बंद झाल्याने नागरिकांना धारगळमार्गे सुमारे १८ ते २० किलोमीटरचा मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. विशेषतः नागझर, वारखंड आणि तुळस्करवाडी येथील ग्रामस्थांना याचा सर्वाधिक फटका बसणार असून, वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार आहेत.
विमानतळ परिसरातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या व्यवसायावर या निर्णयामुळे गदा आली आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर सेवा तातडीने मिळण्यास विलंब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस स्टेशन किंवा इतर शासकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही आता अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.
रस्ता पूर्ववत करण्याची मागणी
हा रस्ता सर्वसामान्यांसाठी तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर, पेडणे काँग्रेस गट अध्यक्ष कृष्णा नाईक, मोपा पीडित जन संघटनेचे भास्कर नारुलकर, संजय आरोस्कर, सागर कारापूरकर आणि उदय महाले यांनी केली आहे. स्थानिकांच्या सोयीसाठी सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास रस्यावर उतरून जाब विचारला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
फोटो ओळी: मोपा विमानतळाचे मुख्य प्रवेशद्वार.          

हेही वाचा