भाज्यांचे दर कडाडले! पणजी बाजारात वालपापडी २५० रुपये किलो

फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर मात्र खुल्या बाजारापेक्षा स्वस्त दरात भाज्यांची विक्री सुरू

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
भाज्यांचे दर कडाडले! पणजी बाजारात वालपापडी २५० रुपये किलो

पणजी : गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ झाली. आवक कमी झाल्याने वालपापडीचे दर जवळपास दुप्पटीने वाढून २५० रुपये किलो झाले आहेत. आल्याचे दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, तर लिंबू आकारानुसार ८ ते १० रुपयांना एक नग मिळत आहे. टोमॅटोचे दर वाढून ६५ रुपये किलो झाले, तर बटाट्याचे दर १० रुपयांनी वाढून ५० रुपये किलो झाले आहेत. कोथिंबीरची जुडी ४० रुपयांना मिळत होती. पुढील काही दिवस भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाजारात मानकुराद आंबा आकारानुसार २०० ते ८०० रुपये डझन या दराने विकला जात होता. हापूस आंब्याची आवक पुरेशी नसल्याने त्याचे दर ५०० ते ८०० रुपये डझन असे होते. कांदा ४० रुपये किलो होता. भेंडी, दोडका, गाजर, कारले आणि गवार प्रत्येकी ८० रुपये किलो दराने विकली जात होती. वांगी आणि काकडीचे दर प्रत्येकी ६० रुपये किलो होते, तर मोठी वांगी ८० रुपये किलो होती. कोबी ४० रुपये किलो, तर फ्लॉवर ४० रुपये प्रति गड्डा होता. याशिवाय पुदिना १५ रुपये आणि मेथीची जुडी १५ रुपयांना मिळत होती. लसूण आकारानुसार २०० ते ४०० रुपये किलो होता.

बाजारात मिरची ८० रुपये, तर ढब्बू मिरची १३० रुपये किलो होती. जांभूळ ३०० रुपयांना १०० नग आणि करवंद १०० रुपये वाटा या दराने विकली जात होती. बाजारात लहान नीरफणस ४०० रुपये, तर मध्यम आकाराचा नीरफणस ५०० रुपये नग या दराने विकला जात होता. फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा २४ रुपये, टोमॅटो ४५ रुपये तर बटाटा २५ रुपये किलो होता. भेंडी २० रुपये, कोबी २६ रुपये, गाजर ४५ रुपये, वालपापडी २०० रुपये आणि मिरची ४५ रुपये किलो दराने विकली जात होती. तर फ्लॉवरचा दर प्रति नग २८ रुपये होता.

हेही वाचा