म​हिला-पुरुष हॉकी ​विश्वचषक २०२६ चे बिगुल वाजले

भारत-पाकिस्तान १९ ऑगस्टला येणार आमने सामने

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27 mins ago
म​हिला-पुरुष हॉकी ​विश्वचषक २०२६ चे बिगुल वाजले

नवी दिल्ली : नेदरलँड्स आणि बेल्जियमच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, भारतीय हॉकी चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय पुरुष आणि महिला संघांची संपूर्ण मोहीम स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. सामने प्रामुख्याने आमस्टेलवीन आणि ॲमस्टरडॅम येथे खेळवले जाणार आहेत. विशेषतः अमस्टेलवीन येथील वैगेनर हॉकी स्टेडियम या स्पर्धेचे प्रमुख केंद्र असेल.
भारतीय पुरुष संघाचे वेळापत्रक (पूल-डी)
भारतीय पुरुष संघाचा समावेश ‘पूल-डी’ मध्ये करण्यात आला असून, या गटात इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्स यांचा समावेश आहे.
पुरुष संघाचे सामने
१५ ऑगस्ट – भारत वि. वेल्स
१७ ऑगस्ट – भारत वि. इंग्लंड
१९ ऑगस्ट – भारत वि. पाकिस्तान
भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा या स्पर्धेतील सर्वात चर्चेचा विषय ठरणार आहे. इतिहासात या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ वेळा सामना झाला असून, भारताने ३ तर पाकिस्तानने २ वेळा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, तब्बल १६ वर्षांनंतर हे दोन्ही संघ पुन्हा विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत, त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारतीय महिला संघाचे वेळापत्रक (पूल-डी)
भारतीय महिला हॉकी संघालाही पूल-डी मध्ये स्थान मिळाले असून त्यांना चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे.
महिलांचे उपांत्य सामने २७ ऑगस्टला, तर अंतिम सामना २९ ऑगस्ट रोजी ॲमस्टरडॅम येथे होईल.
भारतीय म​हिलांचे वेळापत्रक
१६ ऑगस्ट – भारत वि. चीन
१८ ऑगस्ट – भारत वि. दक्षिण आफ्रिका
२० ऑगस्ट – भारत वि. इंग्लंड
स्पर्धेचे स्वरूप
या विश्वचषकात एकूण चार गट (Pools) आहेत.
‘अ’ आणि ‘क’ गटातील अव्वल दोन संघ ‘पूल-ई’ मध्ये प्रवेश करतील. ‘ब’ आणि ‘ड’ गटातील अव्वल दोन संघ ‘पूल-एफ’ मध्ये प्रवेश करतील पुरुष गटाचे उपांत्य सामने २८ ऑगस्टला, तर अंतिम सामना ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.
पुरुष गट
पूल ए: नेदरलँड्स, अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान
पूल बी: बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, मलेशिया
पूल सी: ऑस्ट्रेलिया, स्पेन, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका
पूल डी: इंग्लंड, भारत, पाकिस्तान, वेल्स
महिला गट
पूल ए: नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चिली, जपान
पूल बी: अर्जेंटिना, जर्मनी, USA, स्कॉटलंड
पूल सी: बेल्जियम, स्पेन, न्यूझीलंड, आयर्लंड
पूल D: चीन, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका