टीम इंडियाचा अंतिम फेरीत दमदार प्रवेश

भारताचा इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th March, 11:57 pm
टीम इंडियाचा अंतिम फेरीत दमदार प्रवेश

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत राष्ट्रीय क्रिकेट संघने इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघवर ७ धावांनी थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत ४२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची तुफानी खेळी केली. त्याला ईशान किशनने चांगली साथ देत १८ चेंडूत ३९ धावा केल्या. या दोघांमध्ये झालेल्या भागीदारीमुळे भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
यानंतर शिवम दुबेने २५ चेंडूत ४३ धावा करत डावाला गती दिली, तर हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ धावांची झटपट खेळी केली. शेवटी तिलक वर्माने अवघ्या ७ चेंडूत २१ धावा करत भारताचा स्कोअर २५३ धावांपर्यंत पोहोचवला. इंग्लंडकडून विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
बॅथेलचे शतक व्यर्थ
२५४ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक लवकर बाद झाले. मात्र जेकब बॅथेलने जबरदस्त खेळी करत सामना जिवंत ठेवला. त्याने ४८ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. त्याला विल जॅक्सने ३५ धावांची साथ दिली. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी २० धावांची गरज होती; मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडला २४६ धावांवर रोखले.
भारतीय गोलंदाजांची निर्णायक कामगिरी
भारताकडून हार्दिक पांड्याने २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत इंग्लंडच्या डावाला आवर घातला.
अंतिम फेरीत भारत
या विजयासह भारताने टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. सॅमसनच्या आक्रमक फलंदाजीसह भारतीय संघाच्या संतुलित कामगिरीमुळे हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. क्रिकेट चाहत्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत थरार अनुभवायला मिळाला.
भारताचे तीन विश्वविक्रम
भारताने उभारलेली २५३ ही धावसंख्या टी-२० विश्वचषक बाद फेरीतील कोणत्याही संघाने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने वेस्ट इंडिजने रचलेला विश्वविक्रम मोडला. २०१२ च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बाद फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने ४ विकेट गमावून २०५ धावा केल्या होत्या.इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात २५३ धावा करून भारताने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावे केला. टी-२० विश्वचषकात दोनदा २५० हून अधिक धावा करणारा भारत आता एकमेव संघ आहे. भारताने यापूर्वी झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यातही २५० अधिक धावांचा डोंगर उभारला होता.
१९ षटकार अन् तिसरा विश्वविक्रमयाशिवाय एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार लगावणारा भारत पहिला संघ आहे. भारताने यंदाच्या विश्वचषकात ८८ षटकार लगावले आहेत. तर ७६ षटकार यंदा वेस्ट इंडिजने लगावले आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या विश्वचषकात ७२ षटकार लगावले आहेत.
भारताने या सामन्यातील एका डावात एकूण १९ षटकार लगावले. टी-२० विश्वचषकाच्या एकाच डावात भारताने १९ षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या धावसंख्येत संजू सॅमसन, शिवम दुबे आणि तिलक वर्मा या तीन भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. यासह टी-२० सामन्याच्या एकाच डावात १९ षटकार लगावणारा भारत हा पहिलाच संघ आहे.
संजू सॅमसन आणि इशान किशनने मिळून दमदार अर्धशतकी भागीदारी केली. यासह मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. संजू सॅमसन आणि इशान किशनने मिळून ४५ चेंडूत ९७ धावांची भागीदारी केली. यासह युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाच्या जोडीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रॉबिन उथप्पा आणि युवराज सिंग या जोडीने २००७ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात ६.३ षटकात ८४ धावांची भागीदारी केली होती. इशान किशन आणि संजू सॅमसनने केलेली भागीदारी ही आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊट सामन्यांमध्ये कुठल्याही भारतीय जोडीने केलेली सर्वोच्च भागीदारी आहे.

संजू सॅमसनने मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने याआधी एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत १५ षटकार खेचले होते . आता संजू सॅमसनने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. संजू सॅमसनला या स्पर्धेतील ४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या ४ सामन्यांमध्ये त्याने सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. संजू सॅमसनने आतापर्यंत १६ षटकार खेचले आहेत.

टी-२० विश्वचषकातील एका सामन्यातील सर्वाधिक षटकार

३४ : भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई, २०२६ उपांत्य फेरी
३१ : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, मुंबई, २०२६
३० : नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड, सिल्हेट, २०१४
२८ : भारत विरुद्ध झिम्बाब्वे, चेन्नई, २०२६
२५ : इंग्लंड विरुद्ध इटली, कोलकाता, २०२६


टी-२० विश्वचषकात तळाच्या फलंदाजांकडून सर्वाधिक धावा
२२६ धावा – विल जॅक्स (२०२६) – स्ट्राईक रेट १७६.५६
२१८ धावा – मिसबाह-उल-हक (२००७) – स्ट्राईक रेट १३९.७४
१७५ धावा – कॅमेरॉन व्हाइट (२०१०) – स्ट्राईक रेट १४९.५७
१७१ धावा – मायकल हसी (२०१०) – स्ट्राईक रेट १७२.७२
१६७ धावा – सॅम करन (२०२६) – स्ट्राईक रेट १२०.१४


टी-२० मध्ये सर्वाधिक एकत्रित धावा
५१७ धावा : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, २०२३
४९९ धावा : भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई, २०२६
४९६ धावा : भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम, २०२६
४८९ धावा : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉडरहिल, २०१६
४८८ धावा : न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड, २०१८
४८८ धावा : बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, सोफिया, २०२२