क्रीडा क्षेत्रासाठी कोट्यवधींची तरतूद; काहींचे अनुदान मात्र प्रलंबित

राष्ट्रीय स्पर्धांवर मोठा खर्च : क्रीडा क्षेत्रासाठी मोठा अर्थसंकल्प

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th March, 09:06 pm
क्रीडा क्षेत्रासाठी कोट्यवधींची तरतूद; काहींचे अनुदान मात्र प्रलंबित

पणजी : राज्य सरकारने क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचा गेल्या चार वर्षांचा अर्थसंकल्पीय खर्च आणि क्रीडा प्रकल्पांचा तपशील विधानसभेत सादर केला आहे. राज्यात क्रीडा क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली जात असल्याचे दिसत असले, तरी काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि क्रीडा संघटनांचे लाखो रुपयांचे अनुदान प्रशासकीय प्रक्रियेत अडकून प्रलंबित असल्याची बाब उघड झाली आहे. क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी सभागृहात या खर्चाचा लेखाजोखा मांडला.

क्रीडा खात्याचा अर्थसंकल्प आणि खर्च

आर्थिक वर्ष तरतूद / मंजूर निधी (रु.)
२०२२-२३१६,१७,५०,५००
२०२३-२४ (सर्वाधिक)४८,४२,४४,२००
२०२४-२५३०,३७,५९,२००
२०२५-२६ (प्रस्तावित)२०,२९,००,२००

राज्यात आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांवरही सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये २०२३ मध्ये झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी १९,१६,७०,०७० रुपये, तर २०२२ मधील फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ३,६२,८४,७८६ रुपये खर्च झाल्याचे सरकारने नमूद केले.

खेळाडू आणि संघटनांचे प्रलंबित अनुदान

एकीकडे कोट्यवधींचा खर्च होत असताना, दुसरीकडे गोव्याचे नाव उंचावणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे रोख पुरस्कार मात्र अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टो (१४.७२ लाख), अनुरा प्रभू देसाई (१४.६० लाख) आणि बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी (२.५० लाख) यांची बक्षिसे प्रलंबित आहेत. तसेच गोवा फुटबॉल असोसिएशन, गोअन्स हॉकी आणि गोवा बुद्धिबळ संघटना यांसारख्या प्रमुख क्रीडा संघटनांचेही अनुदान प्रशासकीय प्रक्रियेत अडकले आहे.

कुंकळ्ळी मतदारसंघातील प्रकल्पांची स्थिती

आमदार युरी आलेमाव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितले की, कुंकळ्ळी क्रीडा संकुलाचे नूतनीकरण आणि क्रिकेट सराव पट्टीचे काम पूर्ण झाले आहे. संकुलातील विद्युतीकरण आणि माखाजन येथील शाळेच्या मैदानावर चेंजिंग रूम उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासकीय मंजुरीचे काम सुरू आहे.

#GoaSports #RameshTawadkar #SportsBudget #GoaAssembly #TanishaCrasto #AnuraPrabhuDesai #GoaCricket