सीबीएसईची शिक्षक पात्रता परीक्षा ६ सप्टेंबरला; अर्ज प्रक्रिया सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 mins ago
सीबीएसईची शिक्षक पात्रता परीक्षा ६ सप्टेंबरला; अर्ज प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : सीबीएसईने (Central Board of Secondary Education)) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET सीटीईटी) सप्टेंबर २०२६ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. ऑनलाइन (online) अर्ज प्रक्रिया ११ मे पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना १० जून २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in आणि cbse.gov.in वरून अर्ज सादर करता येतील.

सीटीईटीची २२ वी आवृत्ती ६ सप्टेंबर २०२६ (रविवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पेपर-I आणि पेपर-II  दोन्ही परीक्षा त्याच दिवशी होणार आहेत. अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास ५ सप्टेंबर २०२६  रोजीही अतिरिक्त परीक्षा घेण्यात येऊ शकते, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू : ११ मे २०२६

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जून २०२६ (रात्री ११.५९ पर्यंत)

शुल्क भरण्याची अंतिम मुदत : १० जून २०२६

अर्ज दुरुस्ती विंडो : १५ ते १८ जून २०२६

प्रवेशपत्र उपलब्ध : परीक्षेच्या दोन दिवस आधी

परीक्षा दिनांक : ६ सप्टेंबर २०२६

अतिरिक्त संभाव्य परीक्षा दिनांक : ५ सप्टेंबर २०२६

निकाल जाहीर होण्याची शक्यता : ऑक्टोबर २०२६ अखेर

सीबीएसईने उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा नियम काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन केले आहे. अर्ज भरल्यानंतर माहितीमध्ये बदल करण्यासाठी १५ ते १८ जूनदरम्यान दुरुस्तीची सुविधा उपलब्ध असेल.

देशभरातील १३२ शहरांमध्ये आणि २७ भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि इतर सीटीईटी गुण स्वीकारणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

इयत्ता १ ली ते ५ वी शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पेपर-I तर इयत्ता ६ वी ते ८वी साठी पेपर-II असणार आहे. इयत्ता १ली ते ८वी पर्यंत अध्यापन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दोन्ही पेपर देता येतील.

सीबीएसईच्या नियमांनुसार परीक्षेत ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे उमेदवार सीटीईटी पात्र ठरतील. मात्र, सीटीईटी पात्रता मिळाल्याने थेट शिक्षक भरतीची हमी मिळत नाही; ती शिक्षक नियुक्तीसाठी आवश्यक पात्रतांपैकी एक अट मानली जाते.

हेही वाचा