चर्चेची वेळ, तारीख वीरेश बोरकर यांनीच ठरवावी : मनोज परब

मतभेद सोडवण्यासाठी नवा प्रस्ताव : आठवडाभर पाहणार उत्तराची वाट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May, 09:58 pm
चर्चेची वेळ, तारीख वीरेश बोरकर यांनीच ठरवावी : मनोज परब

पणजी : आरजीपीमधील अंतर्गत मतभेद तीव्र झाल्यानंतर पक्ष आता ‘डॅमेज कंट्रोल’ मोडमध्ये आला आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी चर्चेस नकार दिल्यानंतर, पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी त्यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. चर्चेची वेळ आणि तारीख बोरकर यांनीच ठरवावी, त्यांच्या सर्व मागण्या ऐकण्यास आम्ही तयार आहोत, असे मनोज परब यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय समितीचे निमंत्रण नाकारले

मनोज परब आणि वीरेश बोरकर यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांना पूर्णविराम देण्यासाठी आरजीपीच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीने सोमवारी सायंकाळी पणजी येथील पक्ष मुख्यालयात चर्चेसाठी आमंत्रण दिले होते. सायंकाळी ३ ते ७ या वेळेत बोरकर, त्यांचे तीन पदाधिकारी, पक्षाध्यक्ष मनोज परब आणि विश्वेश नाईक यांच्यात ही चर्चा होणार होती. मात्र, बोरकर यांनी केंद्रीय समितीचे निमंत्रण नाकारून आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

प्रवासाचे नियोजन आणि वेळेचा प्रश्न

राजकीय वेळ आणि घड्याळाची वेळ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सायंकाळी ३ ते ६ या वेळेत उपस्थित राहण्याबाबतच्या पत्राची आपण नोंद घेतली आहे. मात्र, गोव्याबाहेर काही कार्यक्रम आधीच निश्चित झाल्याने प्रवासाचे नियोजन आणि चर्चेची वेळ यात विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे चर्चेला उपस्थित राहू शकत नाही. सर्वांच्या सोयीने योग्य वेळ परस्पर संमतीने ठरवणे अधिक योग्य ठरेल, असे आमदार वीरेश बोरकर यांनी त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मागण्या स्पष्ट करण्याचे आवाहन

बोरकर यांना रविवारी सायंकाळी ई-मेलद्वारे बैठकीचे आमंत्रण दिले होते. मात्र सोमवारी दुपारी १२.४६ वाजता त्यांनी ई-मेल पाठवून गोव्याबाहेर असल्याचे कळवले. त्यामुळे गोव्यात आल्यानंतर आमदारांनी स्वतःची वेळ आणि तारीख तातडीने कळवावी, तसेच इतर कोणाशी चर्चा करायची असल्यास तेही सांगावे. बोरकर यांना अध्यक्षपद हवे आहे का, पक्ष हवा आहे का किंवा ज्युलियस यांना पुन्हा पक्षात घ्यायचे आहे का, हे चर्चेनंतरच स्पष्ट होईल, असे मनोज परब यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

संपूर्ण गोव्यातील आरजीपी कार्यकर्ते आणि पक्षावर प्रेम करणारे समर्थक या घडामोडींमुळे चिंतेत आहेत. कोणताही गोंधळ न वाढवता हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला हवा. आम्ही आठवडाभर वाट पाहू; तोपर्यंत बोरकर यांनी पुढे येऊन चर्चा करावी, असे मनोज परब यांनी म्हटले आहे.

वीरेश बोरकर यांची प्रतिक्रिया

“सध्या गोव्यात नसल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे मी खूप दुखावलो आहे. माझाच पक्ष आणि माझीच माणसे असे आरोप करतील, याचा मी कधीच विचार केला नव्हता. लोकांसाठी उभे राहायचे असेल तर संघर्ष सहन करण्याची तयारी ठेवावी लागते.”

– वीरेश बोरकर, आमदार, आरजी
काय म्हणाले वीरेश बोरकर?
1
रिव्हॉल्युशनरी गोवन्स ही संघटना एखाद्या व्यक्तीसाठी नव्हे, तर प्रत्येक गोमंतकीयासाठी निर्माण झाली आहे.
2
कलम ३९/अ आणि गोव्याच्या विनाशाविरुद्धची आपली लढाई वैयक्तिक नसून ती गावांसाठी, संस्कृतीसाठी आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे.
3
एका व्यक्तीच्या द्वेषाला गोव्यावरील प्रेमापेक्षा मोठे होऊ देऊ नका आणि वीरेश बोरकर यांना विसरून फक्त गोव्याचा विचार करा.
#GoaPolitics #RGP #VireshBorkar #ManojParab #GoaNews #PoliticalCrisis #BreakingNews #GoaPoliticalNews