गोवा : सार्वजनिक बांधकाम खात्यात ३५१ कामगारांच्या पदांसाठी भरती

कामगार पुरवठा संस्थेअंतर्गत भरणार पदे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : सार्वजनिक बांधकाम खात्यात ३५१ कामगारांच्या पदांसाठी भरती


पणजी :
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (public works department) कामगार पुरवठा संस्थेने ३५१ कामगारांची पदे जाहीर केली आहेत. ही पदे पूर्णपणे रोजंदारीवर असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेत दिली आहे.

खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण ३५१ पदांपैकी १२१ पदे कुशल कामगार, ६० पदे अर्ध-कुशल कामगार आणि १७० पदे अकुशल कामगारांसाठी जाहीर करण्यात आली आहेत. कुशल कामगारांसाठी दररोजचे वेतन ६७१ रुपये, अर्ध-कुशल कामगारांसाठी ६१७ रुपये आणि अकुशल कामगारांसाठी दररोज ५५६ रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे.

कुशल वर्गातील १२१ पदांपैकी ७१ पदे वर्क असिस्टंट, २७ पदे इलेक्ट्रिशियन आणि २३ पदे प्लंबरसाठी आहेत. अर्ध-कुशल वर्गातील ६० पदे ही पर्यवेक्षकांची (सुपरवायझर) आहेत. तर अकुशल वर्गातील १७० पदांपैकी ३१ पदे हेल्पर, २३ पदे स्वीपर, ३० पदे वॉचमन आणि पंप अटेंडंट व शिपाई (प्यून) या पदांसाठी प्रत्येकी ४३ पदे आहेत.

अर्ज कोठे आणि केव्हा करावा?
या पदांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत आहे. इच्छुकांनी ८ जून २०२६ पर्यंत आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयातील कामगार पुरवठा संस्थेच्या कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन खात्याने केले आहे.

हेही वाचा