गोवा : तालुकास्तरीय कचरा व्यवस्थापन देखरेख पथकांची स्थापना

तालुका प्रतिनिधींची नियुक्ती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th May, 11:16 pm
गोवा : तालुकास्तरीय कचरा व्यवस्थापन देखरेख पथकांची स्थापना

पणजी : तालुकास्तरावर घन कचरा व्यवस्थापन (solid waste management) नियम २०२६ची अंमलबजावणी करणे, कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांची पाहणी करणे, कचरा अनधिकृत ठिकाणी टाकण्यापासून रोखणे अशी विविध कामे करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सर्व तालुक्यांत तालुकास्तरीय पथकांची स्थापन केली आहे. नऊ सदस्यीय पथकाच्या अध्यक्षपदी उपजिल्हाधिकारी असतील. पोलीस, पर्यटन, आरोग्य खात्यातील अधिकारी, बीडीओ, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

याबाबत घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने भोपाळ महानगरपालिका विरुद्ध डॉ. सुभाष सी. पांडे व इतर प्रकरणात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार कचरा टाकण्याच्या जागांची पाहणी करणे, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६च्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, अवैध कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे आणि याबाबतचा अहवाल सादर करणे या कामांसाठी तालुकास्तरीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

या तालुकास्तरीय पथकांसोबत समन्वय साधणे, नियमांची अंमलबजावणी करणे व अन्य संबंधित उपक्रमांसाठी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने तालुका प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. पेडणे तालुक्यासाठी नंदेश नाटेकर, बार्देशसाठी धीरज चोडणकर, तिसवाडीमध्ये प्रणव नगर्सेकर, डिचोली आणि सत्तरीमध्ये राजदत्त मापारी, फोंडामध्ये कृपेश देसाई, मुरगावमध्ये साईल कामत, सांगे आणि धारबांदोडामध्ये किरण बुरुड, सासष्टीमध्ये रजत चितारी, केपेमध्ये गजानन कामत, काणकोणमध्ये गौरेश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुका प्रभारींच्या जबाबदाऱ्या
- घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या तालुका प्रभारींना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यांना घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची अंमलबजावणी आणि कार्यवाही करण्यासाठी संबंधित उपजिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, नगरपालिका, ग्रामपंचायती, राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पोलीस खाते आणि इतर संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा लागणार आहे.
- याशिवाय त्यांना तालुकास्तरीय पथकांनी निश्चित केलेल्या कचरा टाकण्याच्या जागा, कचरा पडण्याची शक्यता असलेली ठिकाणे, रस्त्यालगतची कचरा टाकण्याची ठिकाणे, बाजारपेठा, जलाशय आणि इतर ठिकाणांच्या तपासणीत सहभागी होणे आवश्यक आहे.
- कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट, उघड्यावर कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि कचऱ्याची अयोग्य वाहतूक/विल्हेवाट लावणे या बाबी ओळखण्यात आणि त्या रोखण्यात मदत करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या तालुका प्रभारींना करावे लागणार आहे.

हेही वाचा