१५० वर्षांपूर्वी जगाची ४ टक्के लोकसंख्या संपवणाऱ्या हवामान संकटाची पुनरावृत्ती होणार ? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.

जागतिक तापमानवाढीच्या काळात आता एका भीषण संकटाची चाहूल लागली आहे, ती म्हणजे ‘मेगा अल निनो’ किंवा ‘सुपर अल निनो’. संशोधकांच्या मते, पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागाचे तापमान ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता २०२६ मध्ये एका अत्यंत शक्तिशाली अल निनोचा उदय होऊ शकतो. हे संकट केवळ निसर्गापुरते मर्यादित नसून, त्याचा संबंध थेट मानवी अस्तित्वाशी आणि इतिहासातील सर्वात मोठ्या विनाशाशी जोडला जात आहे.

सुमारे १५० वर्षांपूर्वी, म्हणजेच १८७७-७८ च्या काळात अशाच एका मेगा अल निनोने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्यावेळी जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ४ टक्के लोकांचा मृत्यू झाला होता. लाखो लोक दुष्काळ आणि उपासमारीचे बळी ठरले होते. आता पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
काय आहे अल निनो आणि त्याचे विज्ञान?
‘अल निनो’ ही एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. जेव्हा पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते, तेव्हा जगभरातील वाऱ्यांच्या दिशा बदलतात. याचा थेट परिणाम पावसावर होतो. अल निनोमुळे भारताचा मान्सून कमकुवत होतो, तर दुसरीकडे अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत अतिवृष्टी व पूर येतो. अल निनो आणि ला निना हे 'ईन्सो' (ENSO) या महाकाय हवामान चक्राचे दोन परस्परविरोधी टप्पे आहेत. २०२६ मध्ये याचे रूपांतर 'सुपर अल निनो'मध्ये झाल्यास २०२७ हे वर्ष जगातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेचे (WMO) तज्ज्ञ विल्फ्रेन ओकिया यांच्या मते, मे ते जुलै २०२६ या काळात अल निनोची स्थिती निर्माण होईल आणि पुढील महिन्यांत ती अधिक तीव्र होत जाईल.
२०२६सालची सर्वात धक्कादायक बाब ही की, जागतिक तापमानासंदर्भातील (global warming) ताज्या आकडेवारीनुसार, भारत (India) जागतिक उष्णतेच्या लाटेच्या केंद्रस्थानी आहे. जगातील १०० सर्वांत उष्ण शहरांपैकी (world's hottest cities) तब्बल ९५ शहरे भारतातील आहेत.
‘एक्यूआयडॉटइन’ (https://www.aqi.in/) या संकेतस्थळाने २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या आकडेवारीतून उपखंडाच्या मोठ्या भागाला विळखा घातलेल्या सध्याच्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणि व्याप्ती अधोरेखित करते. मध्य भारतापासून ते इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत, अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तर अनेक ठिकाणी ते ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे.

या यादीत केवळ प्रमुख शहरी केंद्रांचाच नव्हे, तर लहान शहरांचाही समावेश आहे, जे उष्णतेची लाट किती व्यापक आणि गंभीर झाली आहे हे दर्शवते. महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यांसारखी राज्ये सर्वाधिक उष्ण आहेत. या प्रत्येक प्रदेशातील अनेक शहरे सर्वांत उष्ण १०० शहरांमध्ये ठळकपणे दिसतात.
इसवी सन १८७७-७८ : जगाची ४ टक्के लोकसंख्या अन्नापाण्याअभावी लोप पावली.
इतिहासाची पाने उलटली तर १८७७-७८ चा काळ हा हवामान इतिहासातील सर्वात काळा अध्याय मानला जातो. पॅसिफिक महासागरातील उष्णतेमुळे त्यावेळी जगभरात तीव्र उष्णतेच्या लाटा आणि दीर्घकाळ चालणारा दुष्काळ पडला होता. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मोठ्या प्रमाणावर पीक अपयश आल्याने भीषण दुष्काळ पडला आणि अन्नाअभावी लाखो लोकांनी जीव गमावला. आधुनिक संशोधनानुसार, त्या एका घटनेने जगाच्या ४ टक्के लोकसंख्येचा घास घेतला होता. हा केवळ नैसर्गिक बदल नव्हता, तर तो एक जागतिक नरसंहारच ठरला होता.

इसवी सन पूर्व १८०० सालापूर्वी सिंधू संस्कृतीचे पतन आणि त्याचा ‘सुपर अल निनो’शी संबंध
अल निनोचा प्रभाव केवळ १५० वर्षांपूर्वीच मर्यादित नाही, तर तो हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतींच्या विनाशास कारणीभूत ठरला आहे. पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी’ (IITM) मधील संशोधक नवीन गांधी आणि त्यांच्या पथकाने दक्षिण भारतातील गुप्तेश्वर आणि कडप्पा येथील लेण्यांमधील प्राचीन चुनखडीच्या अवशेषांचा (Speleothems) अभ्यास केला. या अभ्यासातून ७००० वर्षांचा हवामान रेकॉर्ड समोर आला आहे. साधारण ४२०० वर्षांपूर्वी, अल निनोच्या वाढत्या घटना, सौर उत्सर्जनातील घट आणि मान्सूनचा पावसाचा पट्टा (ITCZ) दक्षिणेकडे सरकल्यामुळे सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात पाऊस कमी झाला. या दीर्घकालीन दुष्काळामुळे हडप्पा आणि मोहेंजोदारो सारखी प्रगत शहरे ओस पडली. नद्यांचे मार्ग बदलले आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले. मध्यपूर्वेतील सुमेरिया, मेसोपोटेमिया आणि बऱ्याच अंशी दक्षिण अमेरिका खंडातील 'माया' संस्कृतीवरही याचा कमी जास्त प्रमाणात फरक पडला. यावरून स्पष्ट होते की, हवामानातील बदल हे मोठ्या साम्राज्यांचा अंत करू शकतात.
/english-betterindia/media/post_attachments/uploads/2016/06/42fb184b9be5641a1f68a8980eb403d3.jpg)
भारतासाठी धोक्याची घंटा: मान्सून आणि अर्थव्यवस्था
२०२६ मधील अल निनो भारतासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) प्राथमिक अंदाजानुसार, २०२६ मध्ये मान्सून सरासरीच्या ९२ टक्के राहू शकतो, जो 'सामान्यपेक्षा कमी' श्रेणीत येतो. जर अल निनो शक्तिशाली झाला, तर भारताच्या उत्तर, मध्य आणि पूर्व भागात भीषण उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळी स्थिती निर्माण होईल. भारताची शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे, पावसाच्या कमतरतेचा थेट परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होईल. यामुळे महागाई वाढू शकते आणि पाण्याचे साठे आटल्यामुळे जलसंकट उभे राहू शकते. पॅसिफिक महासागरातील मिठाच्या बदलत्या पातळीमुळे या धोक्याची तीव्रता आणखी २० टक्क्यांनी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

तज्ज्ञांचे मत आणि उपाययोजना
शास्त्रज्ञांच्या मते, या संकटाला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे. जरी याला आताच 'मेगा अल निनो' म्हणणे घाईचे असले, तरी चिन्हे अतिशय गंभीर आहेत. भविष्यातील जल व्यवस्थापन सुधारणे, उष्णतेशी लढण्यासाठी 'हीट ॲक्शन प्लॅन' राबवणे आणि शेतकऱ्यांसाठी भक्कम आधार यंत्रणा उभी करणे हाच या संभाव्य संकटातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. हवामान बदलाचा वेग पाहता, निसर्गाच्या या प्रकोपाला हलक्यात घेणे भविष्यात महाग पडू शकते.