पाकिस्तानातील 'सुन्नतनगर' झाले 'संतनगर', 'खान चौक' झाला 'लक्ष्मी चौक'

रस्ते, चौकांना फाळणीपूर्वीची हिंदू, शिख नावे

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
11 mins ago
पाकिस्तानातील 'सुन्नतनगर' झाले 'संतनगर', 'खान चौक' झाला 'लक्ष्मी चौक'

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ऐतिहासिक लाहोर शहराचा सांस्कृतिक वारसा आणि मूळ ओळख परत मिळवून देण्यासाठी प्रांतिक सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गेल्या काही दशकांत राजकीय आणि धार्मिक कारणांमुळे बदलण्यात आलेली रस्ते, चौक आणि गल्ल्यांची नावे बदलून त्यांना पुन्हा फाळणीपूर्वीची मूळ नावे दिली जात आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या संकल्पनेतून आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांच्या नेतृत्वाखाली हा 'हेरिटेज रिव्हायव्हल' (सांस्कृतिक पुनरुज्जीवन) प्रकल्प अत्यंत वेगाने राबवला जात आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे लाहोरच्या बहुसांस्कृतिक इतिहासाला पुन्हा उजाळा मिळणार आहे.

या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत लाहोरमधील अनेक प्रमुख हिंदू, शिख आणि वसाहतकालीन नावांची पुनर्स्थापना केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने 'सुन्नत नगर'चे नाव बदलून पुन्हा 'संतनगर' केले जाणार आहे, तर प्रसिद्ध 'मौलाना जफर अली खान चौक' आता जुन्या 'लक्ष्मी चौक' या नावाने ओळखला जाईल. याशिवाय 'मुस्तफााबाद'चे नाव बदलून 'धरमपुरा' केले जात असून कृष्णनगर, राम गली आणि जैन मंदिर रोड यांसारख्या ऐतिहासिक भागांनाही त्यांची मूळ नावे परत दिली जात आहेत. केवळ फाळणीपूर्वीची नावेच नव्हे, तर ब्रिटिश कालीन 'फातिमा जिन्ना रोड'चे नाव 'क्वीन्स रोड' आणि 'बाग-ए-जिन्ना'चे नाव पुन्हा 'लॉरेन्स गार्डन' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुमारे ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शहराचा ऐतिहासिक पोत जपून 'हेरिटेज टुरिझम' म्हणजेच ऐतिहासिक पर्यटनाला चालना देणे हा आहे. युरोपीय देशांप्रमाणे पाकिस्ताननेही आपल्या शहरांचा इतिहास पुसून टाकण्याऐवजी तो जपायला हवा, असा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत केवळ नामांतरच नव्हे, तर मिंटो पार्क (ग्रेटर इक्बाल पार्क) येथील फाळणीपूर्वीच्या तीन ऐतिहासिक क्रिकेट मैदानांचे आणि पारंपरिक कुस्ती आखाड्याचेही पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या ऐतिहासिक मैदानांशी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील महान खेळाडूंच्या आठवणी जोडलेल्या आहेत. या निर्णयामुळे लाहोरच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा फाळणीपूर्वीच्या बहुसांस्कृतिक इतिहासाचे वारे वाहू लागले आहेत.

हेही वाचा