दोनापावला येथील बीएमडब्ल्यू चालकाचे जुने कारनामे उघड

जानेवारीत क्षुल्लक कारणांवरून केला होता एका कुटुंबावर हल्ला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26 mins ago
दोनापावला येथील बीएमडब्ल्यू चालकाचे जुने कारनामे उघड

पणजी : दोनापावला येथील रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा एकाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून ईव्ही, स्कोडा रॅपिड आणि थार या तीन वाहनांना धडक दिली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी जगदीश सरदेसाई (वय २७, रा. दोनापावला) याला अटक केली. या अटकेनंतर आता संशयित कार चालकाच्या मुजोरी आणि हिंसक वर्तनाविरुद्ध आधीच्या एका घटनेतील पीडित महिला आणि तिचे कुटुंब जाहीरपणे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेची आपबिती या पीडित महिलेने प्रसारमाध्यमांसमोर मांडली.



नेमकी घटना काय?

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात रात्रीच्या वेळी भूक लागल्यामुळे हे कुटुंब दोनापावला येथील डोमिनोज जवळ गाडी पार्क करून पार्सल घेण्यासाठी गेले होते. पार्सल घेऊन करंजाळेच्या दिशेने जाण्यासाठी जेव्हा त्यांनी गाडीचा इंडिकेटर दाखवून यु-टर्न (U-Turn) घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोरून अत्यंत वेगाने एक बीएमडब्ल्यू कार आली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी पीडित कुटुंबातील चालकाने आपली गाडी जागच्या जागी थांबवली.

गाडी थांबवली असतानाही, समोरून आलेल्या त्या बीएमडब्ल्यू चालकाने अत्यंत आक्रमक होत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने पीडितांच्या गाडीच्या काचा (विंडो मिरर) तोडल्या आणि गाडीत बसलेल्या चालकावर एकामागून एक ठोसे मारत  हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गाडीतील चालकाच्या डोक्याला आणि शरीराला दुखापत झाली. संशयित इतक्यावरच थांबला नाही, तर तो पुन्हा आपल्या गाडीत गेला आणि तिथून धारदार शस्त्र (सुरा) घेऊन हल्ला करण्यासाठी धावला.

पोलीस स्थानकात धाव आणि सुटका

बीएमडब्ल्यू चालक हातात शस्त्र घेऊन येत असल्याचे पाहून गाडीतील कुटुंब प्रचंड घाबरले. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून गाडी चालू केली आणि तिथून थेट पोलीस आउटपोस्ट गाठली. पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी पीसीआर (PCR) व्हॅन पाठवली आणि पीडितांची वैद्यकीय तपासणी (Medical) करून घेत नॉन-कॉग्निझेबल (NC) गुन्हा दाखल केला.

न्यायाची मागणी

या घटनेमुळे आमचे केवळ शारीरिक नुकसानच झाले नाही, तर आम्हाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, अशा भावना पीडित महिलेने व्यक्त केल्या. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर सुरक्षितपणे वावरता यावे, यासाठी या युवकावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी आता या पीडित कुटुंबाने केली आहे.

हेही वाचा