भरघोस परताव्याच्या आमिषाने ऑनलाईन गुंतवणूक; केपेत एकाची १ लाखाची फसवणूक

केपे पोलिसांनी नोंदवला अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
भरघोस परताव्याच्या आमिषाने ऑनलाईन गुंतवणूक; केपेत एकाची १ लाखाची फसवणूक

केपे : ऑनलाईन गुंतवणुकीवर (Online investment)  भरघोस परताव्याचे आमिष दाखवत केपे येथील एका व्यक्तीची तब्बल १ लाख रुपयांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी केपे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

केपे पोलिसांनी (Quepem) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जाधव (रा. कट्टा-अमोणा, केपे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ५ मे २०२६ रोजी एका महिलेने संपर्क करून स्वतःची ओळख “शिवानी” अशी करून दिली. तिने ‘लेमॉन’ (“Lemonn” Aap)  नावाच्या अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून फिर्यादीला विश्वासात घेतले.

संशयित महिलेने फिर्यादीला ‘लेमॉन’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.  त्याची एपीके (APK) फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर मोबाईलवरील ‘ॲक्सेसिबिलिटी परमिशन’ सुरू करण्यास भाग पाडून संश‌यिताने तक्रारदाराच्या मोबाईलवर अनधिकृत प्रवेश मिळवला.

त्यानंतर “सेन्सेक्स ७३०००” मध्ये मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवत तक्रारदाराकडून १ लाख ४६ रुपये गुंतवून घेतले. मात्र, ही रक्कम तक्रारदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या “लेमॉन” खात्यातून विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आली.

या प्रकारामुळे प्रदीप जाधव यांची एकूण १,००,०४६ रुपयांची फसवणूक झाली असून; अज्ञात आरोपींविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दीपा देईकर करीत आहेत.

हेही वाचा