
नवी दिल्ली : भारतातील सोशल मीडिया आणि इंटरनेट राजकारणात एक अनोखा ट्रेंड पाहायला मिळत आहे. व्यंगात्मक आणि मीम-आधारित ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नव्या डिजिटल चळवळीने अवघ्या चार दिवसांत इंस्टाग्रामवर तब्बल १०.१ दशलक्ष फॉलोअर्स मिळवत भारतीय जनता पक्षालाही मागे टाकल्याचा दावा केला आहे. सध्या भाजपचे इंस्टाग्रामवर ८.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काही बेरोजगार युवकांची तुलना “कॉकरोच” आणि “परजीवी” यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यातूनच ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक डिजिटल चळवळीचा जन्म झाला. सुरुवातीला हा केवळ इंटरनेटवरील विनोदी प्रतिसाद मानला जात होता; मात्र काही दिवसांतच युवकांमध्ये लोकप्रिय ठरत मोठ्या सोशल मीडिया आंदोलनात परिवर्तित झाला.
तरुणांच्या शक्तीला कमी लेखू नका
या यशानंतर पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत “फक्त चार दिवस लागले; तरुणांच्या शक्तीला कमी लेखू नका,” असा संदेश दिला. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही भाजपच्या “जगातील सर्वात मोठा पक्ष” या दाव्यावर टोला लगावत एक्सवर पोस्ट केली.
युवकांच्या नाराजीवर भाष्य
‘वॉईस ऑफ द लेझी ॲंड अनएम्पॉलयड’ (‘Voice of the Lazy & Unemployed’) अशी स्वतःची ओळख सांगणारी ही व्यंगात्मक संघटना बेरोजगारी, संस्थात्मक अहंकार, राजकीय विशेषाधिकार आणि युवकांच्या नाराजीवर भाष्य करत आहे. विनोदी शैलीत मांडलेल्या या चळवळीमागे गंभीर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांची धार असल्याचे सोशल मीडिया वापरकर्त्यांचे मत आहे.
या पक्षाच्या जाहीरनाम्यात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर बंदी, माध्यमांकडून होणाऱ्या चुकीच्या माहितीवर कारवाई, तसेच महिलांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व देण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
चळवळीला युवकांकडून मोठा प्रतिसाद
इंस्टाग्राम, एक्स आणि विविध मीम पेजेसवर या चळवळीला युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, इंटरनेटच्या युगातील नव्या प्रकारच्या राजकीय अभिव्यक्तीचे हे उदाहरण मानले जात आहे.