नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरमधील डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी

शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर सापडले अनेक धागेदोरे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरमधील डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी

लातूर : नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) कथित पेपरफुटी प्रकरणातील तपास आता अधिक व्यापक होत असून; केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI)  लातूरमधील काही डॉक्टरांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. मंगळवारी संध्याकाळी सीबीआयचे पथक शहरातील औसा रोड परिसरातील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या रुग्णालयात दाखल झाले. दोन तासांहून अधिक काळ संबंधित डॉक्टरची कसून चौकशी करण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कथित फुटलेला नीट (NEET)  पेपर संबंधित डॉक्टरपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआयला आहे. तसेच हा पेपर विकत घेण्यात आला होता का, याचाही तपास यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे. या चौकशीमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर सापडले अनेक धागेदोरे 

दरम्यान, आरसीसी (RCC)  क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक धागेदोरे लातूरशी जोडले जात असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे सीबीआयकडून शहरातील विविध व्यक्तींची चौकशी सुरू असून; तपासाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

आरसीसी कोचिंग क्लासची पुन्हा झाडाझडती

याच पार्श्वभूमीवर सीबी्आय पथकाने पुन्हा एकदा लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासची झाडाझडती घेतली. विविध कागदपत्रे, संगणकीय माहिती आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी करण्यात आली. तपास यंत्रणा कथित “मॉक प्रश्नपत्रिका”, विद्यार्थ्यांचे संपर्क, परीक्षा पूर्व मार्गदर्शन सत्रे आणि प्रश्नपत्रिका गळतीशी संबंधित संभाव्य दुव्यांची पडताळणी करत असल्याचे समजते.

मोटेगावकरच्या मुलाची चौकशी 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर याच्या बारावीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट  परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली.  पुणे येथील सीबीआय कार्यालयात त्याची सविस्तर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याची चर्चा असून; कथित प्रश्नपत्रिका विवेक पाटीलसह काही विशिष्ट व्यक्तींपर्यंत प्रथम पोहोचल्याचा संशयही तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लातूरच्या कोचिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, पुढे आणखी कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा