मिकी पाशेको बाणावलीतून विधानसभा निवडणूक लढणार, तर पत्नी नुवेतून

काँग्रेसवर केला पैशांच्या बदल्यात उमेदवारी देण्याचा आरोप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st May, 12:39 pm
मिकी पाशेको बाणावलीतून विधानसभा निवडणूक लढणार, तर पत्नी नुवेतून

मडगाव: आगामी निवडणूक बाणावली मतदारसंघातून आपण स्वतः तर नुवे मतदारसंघातून आपली पत्नी व्हिओला पाशेको लढणार असल्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांनी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेस पक्षामध्ये पैशांच्या बदल्यात तिकिटांची विक्री होते, त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी दिली तरी आपण ती घेणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.




माजी मंत्री मिकी पाशेको यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, बाणावली मतदारसंघातून यापूर्वी आपण तीनवेळा निवडून आलो असून, यावेळीही तिथूनच निवडणूक लढवणार आहे. तसेच, नुवे मतदारसंघातून पत्नी व्हिओला पाशेको नशीब आजमावतील. ही निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाकडून लढणार, याचा निर्णय अद्याप झाला नसून ते एक 'सरप्राईज' असेल, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्ष आता पूर्णपणे कॉम्प्रमाईझ करणारा पक्ष झाला आहे. त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी तीन महिन्यांपूर्वीच वेळ दिला होता, तसेच निवडणुकीचा खर्चही आपणच करू असे सांगितले होते; मात्र त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. ज्या दिवशी आपण बाहेर पडू, त्या दिवशी आपली संघटना काँग्रेसपेक्षा मोठी असल्याचे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१२ मध्ये काँग्रेस नको म्हणून सर्वांनीच पाठिंबा दिल्यामुळे आपणही भाजपला पाठिंबा दिला होता. कधीकाळी सागरासमान असणारा काँग्रेस पक्ष आता एका तळ्याएवढाच राहिला आहे. उरलेले नेतेही काँग्रेस संपवत असून ते भाजपशी फितूर आहेत, अशी टीका मिकी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अनेक राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला असून योग्य वेळी कोणत्या पक्षातून लढायचे, याचा निर्णय घेतला जाईल. काँग्रेसमध्ये विशिष्ट लोकांची लॉबी असून हा पक्ष केवळ पैसेवाल्यांनाच जवळ करतो. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेस करोडो रुपये घेऊन, सामाजिक कार्य नसलेल्यांना उमेदवारी देतो. यावेळीही तेच घडणार आहे. तमिळनाडूमध्ये गेल्या वेळी काँग्रेसकडे ११ जागा होत्या, त्या आता याच कारणामुळे ५ जागांवर आल्या आहेत. पैशांच्या जोरावर उमेदवारी मिळवणारे लोक भविष्यात पैसे घेऊनच दुसऱ्या पक्षात जातील, असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत आपण कधीही भ्रष्टाचार केलेला नाही, हे जर कोणी सिद्ध करून दाखवले तर आपण राजकारण सोडू, असे आव्हानही पाशेको यांनी शेवटी दिले.

हेही वाचा