राजीव गांधी यांचे गोव्यासाठीचे योगदान विसरू नये : काँग्रेस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
राजीव गांधी यांचे गोव्यासाठीचे योगदान विसरू नये : काँग्रेस

पणजी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कोकणी भाषेला अधिकृत भाषेचे स्थान दिले. त्यांनीच गोव्याच्या प्रगतीसाठी घटकराज्याचा दर्जा दिला. त्यांचे योगदान गोवेकरांनी कधीच विसरू नये; असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

पणजी येथे राजीव गांधी यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फ्रान्सिस सार्दिन, एम. के. शेख, अमरनाथ पणजीकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पाटकर म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी (Ex-Prime Minister Rajiv Gandhi)  यांनी देशात आयटी  क्रांती घडवून आणली. यामुळे देशात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली.

त्यांनी अधिकाधिक युवकांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कालावधीत मतदानाचा अधिकार २१ वरून १८ वर्षे करण्यात आला. ते एक आदर्श आणि शिक्षित पंतप्रधान होते. मात्र आज देशातील नेतृत्व दिशाहीन आहे. आज देशाकडे कोणतेही आर्थिक धोरण नाही. परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी आज पंतप्रधान लोकांना सोने खरेद करू नका, इंधन वाचवा असे सल्ले देत आहेत.

गोव्यातील (Goa) भाजप सरकार राज्याची नासाडी करत आहे. मागील १४ वर्षे राज्यातील पर्यावरणाची नासाडी करत आहे. प्रत्येक गोमंतकीय व्यक्तीने राजीव गांधी यांच्या राज्याच्या तसेच देशाच्या विकासाचा विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. आज राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी असा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या जुलमी गोष्टीं विरोधात लढा देत आहेत. 

अशा नेत्यांना आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. यासाठी येणाऱ्या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने काँग्रेसला (Congress Party)  निवडून द्यावे. असे केले तरच गोवा वाचवता येईल असे पाटकर यांनी सांगितले.

हेही वाचा