गोव्याची वाटचाल 'वर्क फ्रॉम बीच' डेस्टिनेशनच्या दिशेने: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

म्हणाले-किनारपट्ट्यांवर इंटरनेटसह उपलब्ध होणार इतरही सुविधा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
गोव्याची वाटचाल 'वर्क फ्रॉम बीच' डेस्टिनेशनच्या दिशेने: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा वापर यापुढे पर्यटनासोबतच व्यवसायासाठीही व्हावा, म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात गोव्याची ओळख पर्यटनासोबतच 'वर्क फ्रॉम बीच डेस्टिनेशन' अशी होणार असून, या दिशेने गोव्याची वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

बागा येथे 'गोवा शॅकथॉन २०२६' चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान (IT) मंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'जेन झी'चे विचार बदलत आहेत. व्यवसाय किंवा नोकरी करताना त्यांना शांतता, समाधान आणि लवचिकता (फ्लेक्सिबिलिटी) हवी असते. कोरोनाच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना रूढ झाली. आता गोव्यात 'वर्क फ्रॉम बीच' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोलवा समुद्रकिनाऱ्यावर इंटरनेट तसेच इतर सुविधा उभारण्याचे काम सुरू झाले असून, इतर किनाऱ्यांवरही इंटरनेटसह अन्य आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या हातात बिअरसोबतच लॅपटॉपही पाहायला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

तरुणांनी केवळ नोकरी मिळवण्याचा प्रयत्न न करता, नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेसोबतच सरकारने स्टार्टअप धोरण तयार केले आहे. गोव्यात सध्या ३४ स्टार्टअप सुरू झाले असून, या स्टार्टअप्सना ४.१० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. विविध योजना आणि सुविधांचा लाभ घेऊन तरुण पिढी 'वर्क फ्रॉम बीच डेस्टिनेशन' ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सहकार्य करेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.

हेही वाचा