दांडेली, रामनगर, यल्लापूरला गोव्यातील लोकांच्या रांगा का लागतात?

तांत्रिकांच्या ‘इलाक्या’मागचे धक्कादायक वास्तव; गोव्यातून देवस्की, जादूटोणा आणि मांत्रिक उपचारांसाठी मोठी वर्दळ

Story: गोवन वार्ता । विशेष प्रतिनिधी |
5 mins ago
दांडेली, रामनगर, यल्लापूरला गोव्यातील लोकांच्या रांगा का लागतात?

पणजीः कर्नाटकातील दांडेली, अनमोड, लोंढा, रामनगर, यल्लापूर तसेच जगलबेट परिसरातील काही गावांमध्ये गोव्यातून जाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. देवस्की, जादूटोणा, मांत्रिक उपचार, भूतबाधा निवारण आणि विविध धार्मिक विधींसाठी गोव्यातील अनेक लोक या भागांकडे धाव घेत असल्याची चर्चा आहे. फक्त गोवाच नाही तर कर्नाटकातील लोकही मोठ्या प्रमाणात या भागात मांत्रिकांच्या शोधार्थ येतात. 

विशेष म्हणजे, या ठिकाणी जाणाऱ्यांमध्ये केवळ अशिक्षित किंवा ग्रामीण भागातील लोक नसून सुशिक्षित, उच्चभ्रू, राजकारणी, कंत्राटदार, व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या, व्यवसायातील अडचणी, राजकीय यश, मानसिक अस्वस्थता किंवा कथित भूतबाधा अशा विविध कारणांसाठी लोक या मांत्रिकांचा आधार घेत असल्याचे समोर येते.

जगलबेट परिसरातील एका गावात तर दररोज गोव्यातून येणाऱ्यांच्या रांगा लागत असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जाते. अनेक प्रभावशाली कुटुंबे, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकही येथे नियमित भेट देत असल्याची चर्चा आहे.

दांडेली आणि यल्लापूर परिसरातील काही मांत्रिकांविषयी लोकांमध्ये विशेष श्रद्धा निर्माण झाली आहे. काही ठिकाणी साप, बोकड आणि इतर प्राण्यांच्या माध्यमातून धार्मिक किंवा गूढ विधी केल्याचेही सांगितले जाते. कर्नाटकात कॉंग्रेस सरकार आहे पण दांडेलीतील या मांत्रिकांच्या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे मांत्रिकांचा प्रभाव वाढत चालला आहे.

आमच्या स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीप्रमाणे राजकारणात यश मिळवण्यासाठी कोणती वेशभूषा करावी, पौर्णिमा-अमावस्येला कोणते विधी करावेत, कोणत्या दिवशी निर्णय घ्यावेत यासारखे सल्लेही तांत्रिकांकडून दिले जातात. गोव्यातील अनेक मोठे नेते, नवोदित राजकारणी तसेच पंचायत स्तरावरील लोक देखील अशा तांत्रिकांच्या प्रभावाखाली गेल्याची चर्चा आहे.

गोवा आणि कोकणातही मांत्रिक व देवस्की करणारे लोक आहेत; मात्र दांडेली परिसरातील तांत्रिकांना विशेष ‘प्रभावी’ मानले जात असल्याने तेथे गर्दी अधिक वाढत असल्याचे चित्र आहे.

साक्षरतेत आघाडीवर असलेल्या गोव्यातील लोक मोठ्या प्रमाणावर अशा अंधश्रद्धांकडे वळत असल्याने सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अंधश्रद्धा, भीती आणि मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेत काहीजण श्रद्धेचा बाजार मांडत असल्याची टीकाही होत आहे. मनःशांती आणि समाधानाच्या शोधात जाणाऱ्या अनेकांना अशा गोष्टींमुळे आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक क्लेशांना सामोरे जावे लागत असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्या नमन सावंत धावस्कर म्हणतात, ‘स्वतःचे डोके स्वतःच्या धडावर नसले की सगळा लोचा होतो. आपल्या संपर्कातील प्रत्येक माणूस सांगत असलेला अनुभव खरा वाटू लागतो. आपल्याला घबाड मिळेल, आपण यशस्वी होऊ, आपली इच्छित कामे पूर्ण होतील असे वाटते. या अंधश्रद्धांना बळी पडण्यास भाग पाडते ती आपल्या मनातील भीती. आपल्याला अमुक योग आहे, असे एखाद्या मांत्रिकाने सांगितले की आपल्याला भीती वाटू लागते.’

लेखिका आणि समाजसेविका असलेल्या नमन सावंत यांच्या मते, ‘बहुतेक अंधश्रद्धांच्या मागे भीती हेच प्रमुख कारण असते. मात्र, आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला वाचवू शकतात. या अंधश्रद्धा आपला आणि आपल्या नातेवाईकांचा जीवही घेऊ शकतात, हे आपण जाणले पाहिजे.’

‘कुठलेही यश प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम आणि बुद्धीची गरज असते. कोणताही शॉर्टकट आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ शकत नाही,’ असे त्या सांगतात.

हेही वाचा