सांत आंद्रेच्या राजकारणावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे (Revolutionary Goans Party ) गोवा पक्ष प्रमुख तथा संस्थापक मनोज परब यांनी हा पक्ष सोडल्यानंतर सध्या गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांनी आपणच स्थापन केलेला पक्ष सोडायला नको होता; अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर आरजीपी पक्षाच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकीय निरीक्षक आणि समर्थकांच्या मते, पक्षाचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक असलेले मनोज परब (Manoj Parab) यांनी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना; अशा निर्णायक टप्प्यावर पक्ष सोडणे आरजीपीसाठी मोठे नुकसान ठरू शकत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
आरजीपीचे संस्थापक तथा मार्गदर्शक मनोज परब यांनी अशा महत्त्वाच्या क्षणी पक्ष सोडायला नको होता; अशी वैयक्तीक भावना गोव्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. रामराव वाघ यांनी व्यक्त केली आहे. ‘गोंयकार’, गोव्यातील पर्यावरण व संस्कृती यांच्या रक्षणाची गरज असताना असा निर्णय घ्यायला नको होता. या लढ्यात आरजीपीची भूमिका महत्त्वाची होती. राजकीय पक्ष स्थापन करून तो चालवणे सोपे काम नाही. आरजीपीने हे करून दाखवले पण महत्त्वाच्या क्षणी पक्ष सोडून देणे योग्य नाही. याला जबाबदार कोण? पक्षाचे हित सोडून सत्तेसाठी कोण स्वार्थी बनला? असे प्रश्नही प्रा. वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
मनोज परब यांच्याशी आपले मतभेद असले तरी त्याला एकट्यालाच या स्थितीला दोष देता येणार नाही. राजकीय पक्ष हे भावनेवर चालत नसतात, भावनांचा वापर पक्षाच्या फायद्यासाठी करून घ्यायचा असतो. थंड डोक्याने राजकीय पक्ष चालवावे लागतात. आरजीपी आणि इतरांनी हे भाजपकडून शिकायला हवे असा सल्लाही प्रा. वाघ यांनी दिला आहे. सद्यस्थितीत आवश्यक प्रगल्भता दाखवलेल्या विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांच्या टीमला शुभेच्छा!
सांत आंद्रेच्या राजकारणावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर आणि त्यांच्या येथील सहकाऱ्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी आहेत. हा नेमका काय विषय आहे आणि गेले दोन महिने सुरू असलेल्या या विषयाचे सांत आंद्रे मतदारसंघावर काय परिणाम होणार? काम करून दाखवण्यास कमी पडले हे या दुराव्याचे मुख्य कारण आहे का? गोव्यात स्वीकार्यता मिळवण्यासाठी केवळ देखावा निर्माण करण्यात आमदाराने हातखंडा मिळवला का? मात्र मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे आता त्यांचे वैशिष्ट्यच बनले आहे का? आता अफवा सुरू आहे ती म्हणजे जुन्या पक्षात प्रवेश घेणार की आणखी काही सुरू आहे? असे प्रश्न प्रा. वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
आमदाराचे सल्लागार असलेल्या काही व्यक्ती बनावट सोशल मिडिया खात्यावरून पोस्ट, व्हिडीओ, मेमे यांच्याद्वारे चुकीची माहिती पसरवत होते; असे माजी प्रमुख मनोज परब म्हणत आहेत. मात्र, आमदाराचे ही स्थिती सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न दिसत नाहीत. त्यामुळे संशय आणखी बळावत असल्याचे प्रा. रामराव वाघ यांनी म्हटले आहे. एकूण या स्थितीचा सांत आंद्रे मतदारसंघावरही परिणाम होणार असल्याचा इशारा वाघ यांनी दिला आहे.